Monday, December 15, 2008

अपंग तरुणांच्या साहसाची ' मोहीम




शारीरिक अपंगत्व असले म्हणून काय झाले?...मन सुदृढ आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर अपंगत्व हा माणसातील कमीपणा ठरू शकत नाही. मग जिद्दीच्या जोरावर कोणतेही साहसच काय, मोठ्या संकटावरही मात करता येते. सध्याच्या तरुणाईकडून याचे प्रत्यंतर वारंवार येते. मग एखादी कला आत्मसात करणे असो किंवा एखादी साहसी मोहीम फत्ते करणे असो. यात अपंग असलो तरी हतबल नाही, असेच ही तरुणाई दाखवून देत असते. अकोले (जि. नगर) येथे झालेल्या साहस शिबिरातही ते दिसून आले.

नगर आणि अकोला (विदर्भ) येथील "अजिंक्‍य ऍडव्हेंचर ग्रुप'ने अकोले तालुक्‍यात राज्यस्तरीय अपंग साहस शिबिराचे आयोजन केले होते. यात राज्यातील तीस अपंग, मतिमंद आणि अंध तरुणी आणि तरुण सहभागी झाले होते. यात दोन अंध आणि दोन मतिमंद तरुणी होत्या. या शिबिरांतर्गत गिर्यारोहणासाठी महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई आणि लगतच्या मदन (मलंग) गडाची निवड करण्यात आली. जिथे धडधाकट माणूसही चढाई करण्यास कचरतो, तिथे अंध आणि अपंगांना घेऊन जाणे, हे आव्हानच असते. परंतु "अजिंक्‍य'चे स्वयंसेवक प्रशांत अमरापूरकर, धनंजय भगत, विलास लहामगे, जयंत कुलकर्णी, राजेंद्र देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रमपूर्वक सर्वांना आत्मविश्‍वास देऊन ही मोहीम पूर्णत्वास नेली.
या मोहिमेबाबत प्रशांत अमरापूरकर म्हणाले, की दैवाने ज्यांना परावलंबी बनविले. त्यांच्या मनात दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण करून त्यांनाही धडधाकट माणसाप्रमाणे जगण्यास प्रवृत्त करायचे, अशी भावना माझ्या मनात आहे. त्यातूनच "अजिंक्‍य'ची स्थापना झाली. सन 1993 पासून गेली 14 वर्षे ही संस्था सामाजिक व क्रीडा उपक्रमाबरोबरच अपंग तरुणांसाठी धाडसी मोहिमांचे आयोजन करीत आहे. यापूर्वी हिमाचल प्रदेशातही साहस शिबिरांचे आयोजन केले होते.
कळसूबाई आणि मदन गडावरील अनुभव मात्र निराळाच होता. एकतर मदनच्या पायथ्याशी पोचणे, हेच मोठे जिकिरीचे काम आहे. आणि हा गड चढून जाणे त्याहून कठीण. त्यात अपंगांना समवेत घेऊन चढाई करणे, हे आमच्यासाठी एक दिव्यच होते. परंतु आमच्यातील सर्वांनीच ही मोहीम फत्ते करण्याचा निश्‍चय केला होता. आम्ही सर्वजण विकलांग तरुणांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करीत होतो. त्यांना उमेद देत होता. परंतु नंतर असे झाले की आमच्यापेक्षा या तरुणांमध्येच जास्त उत्साह निर्माण झाला होता. त्यामुळेच ही मोहीम यशस्वी झाली.

कळसूबाईवर गिर्यारोहण
कळसूबाईच्या (उंची सुमारे साडेसोळाशे मीटर) शिखरावर जाण्याचा मार्ग अत्यंत खडतर आहे. कुठे अंगावर येणारा चढ, कुठे एकीकडे निमुळती पायवाट आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी, कुठे शिड्या. त्यावर चढून पुढे वाटचाल करावी लागते. या मोहिमेत एक पाय नसलेला राजेश बैजनाथ तावरी हा तरुण सहभागी झाला होता. अनेक अंध तरुण होते. या सर्वांची जबाबदारी स्वयंसेवकावर होती. स्वतःला सांभाळत त्यांनाही सांभाळण्याचे काम प्रत्येकाने चोखपणे बजावले होते. तब्बल चार तास चढल्यानंतर सर्वजण कळसूबाईच्या शिखरावर पोचले. त्यावेळी प्रत्येकाच्याच विशेषतः अपंगांच्या चेहऱ्यावर अपरिमित आनंद दिसत होता. नंतर साहसवीरांचा हा गट कळसूबाई उतरून आंबेवाडीत मदन गडाच्या पायथ्याशी आला. मदन गडावरून शेजारच्या अलंग गडावर व्हॅली क्रॉसिंग करण्यात येणार होते.

थरारक अनुभव
याविषयी विलास लहामगे आणि राजेंद्र देशमुख यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की मदन हा चढाईसाठी महाराष्ट्रात सर्वांत अवघड गड आहे. त्याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे साडेचौदाशे मीटर आहे. हा गड सातवाहन काळातील आहे. स्वातंत्र्य युद्धाच्या काळात क्रांतिकारकांनी या गडाचा उपयोग करून घेतला. ब्रिटिशांचा खजाना लुटून या गडावर ठेवण्यात ठेवला जायचा, असे सांगितले जाते. गिर्यारोहणाच्या साहित्याशिवाय या गडावर चढणे अवघड आहे. चढायला सुरवात झाली, तेव्हा वरपर्यंत पोचतो की नाही, अशी मनात शंका येत होती. परंतु आमच्यासारख्या धडधाकटांपेक्षा विकलांग सहकाऱ्यांचा विश्‍वास दृढ होता. त्यांनी अवघ्या चार तासांत मदनचे शिखर गाठले होते. पुढचा टप्पा व्हॅली क्रॉसिंगचा होता. पाचशे फूट लांबी आणि खाली दोन हजार फूट खोल दरी, अशी स्थिती होती. खोल दरीत डोकावल्यानंतरच अंगावर शहारे येत होते. पुढे तर केवळ एका दोराच्या आधाराने व्हॅली ओलंडायची होती. हा अत्यंत थरारक अनुभव होता... प्रत्येकजण दरी ओलांडून अलंग गडावर येत होता. तोपर्यंत प्रत्येकाचाच श्‍वास रोखला जात होता.
सर्वजण अलंगवर पोचले. आता याच गडावरून आम्ही खाली उतरणार होतो. अलंगवर एकदिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उतरण्यास सुरवात केली. सर्वाधिक काळजी उतरताना घ्यावी लागणार होती. अनेक ठिकाणी जागेवर उताराचा भाग असल्याने पाय घसरण्याची शक्‍यता जास्त होती. त्यामुळे उतरताना बहुतांश ठिकाणी शिड्यांचा वापर केला. याच दरम्यान काहीजणांनी रॅपलिंगही (दोराच्या साह्याने) केले. प्रत्येकजण विजयी मुद्रेने उतरत होता. कारण अपंगांना घेऊन एक मोहीम पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी झालो होतो.
या मोहिमेत सहभागी झालेला विदर्भातील राजेश तावरी याची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. तो म्हणतो, ""सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर गिर्यारोहण करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. शरीराचा एक अवयव नाही म्हणून काही जीवन थांबत नाही.'' अपंगत्वामुळे जे स्वत:ला दुर्बल समजतात त्यांच्यासाठी हे वाक्‍य निश्‍चितच उमेद देणारे ठरेल.
प्रशांत अमरापूरकर : 9422228810
विलास लहामगे : 9423160513

Monday, October 20, 2008

मराठीतले "सर्वस्पर्शी' संगीतकार

"सारेगमप लिटल चॅम्प' या कार्यक्रमाच्या एका भागात शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर मान्यवर परीक्षक होत्या. एका स्पर्धकाने हिंदी गाणे चांगले म्हटले. त्यावर "आताच एवढा चांगला परफॉर्मन्स दिलाय. आतापासूनच बॉलिवूडमध्ये जाण्याची तयारी कर. मी हिंदीत स्थान मिळविण्यासाठी अजून स्ट्रगल करतोय,' अशी प्रतिक्रिया अवधूत गुप्ते याने दिली होती. यावर श्रुती सडोलीकर यांनी केलेली कॉमेंट मराठी माणसाचं आत्मभान जागं करणारी होती.
""अवधूत, तुला बॉलिवूडमध्ये करिअर करायचंय, हे ठीक आहे; पण कुणीतरी मला संधी देईल आणि मी तिथे जाईल, अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा मराठी संगीतच इतकं समृद्ध करायला पाहिजे, की तुमच्याकडे मराठी गाणी गाण्याची संधी द्या, अशी मागणी अनेकांनी केली पाहिजे.'' श्रुतीताईंची ही प्रतिक्रिया मनात घर करून राहिली आहे.
इथं हा प्रसंग देण्याचं कारण संगीतकार अजय-अतुल हे आहेत. या जोडीचा मराठी चित्रपट आणि संगीत क्षेत्रात सध्या बोलबाला आहे. मराठी संगीतातील पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन या दोघांनी नवनवीन प्रयोग केले. "साडे माडे तीन' या चित्रपटात "जाझ'सारख्या संगीत शैलीचा वापर करून त्यांनी मराठी संगीताला वेगळा बाज देण्याचा प्रयत्न केलाय. "मन उधाण वाऱ्याचे...', "कोंबडी पळाली...' "सारेगमप'चे शीर्षकगीत... आठवा त्यांची ही गाणी... म्हणूनच या "सर्वस्पर्शी' संगीतकारांना आता मराठीतील ए.आर. रहमान म्हटलं जातंय.
संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल या दोघांना नुकताच प्रतिष्ठेचा "निनाद' पुरस्कार मिळाला आहे. मराठी संगीताला ते पाश्‍चिमात्य नजरेतून पाहतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मराठी संगीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे का असू शकत नाही, असा प्रश्‍न ते विचारतात. या संगीताला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले आहे. त्यासाठी हिंदी गाण्यांच्या तोडीची गाणी त्यांनी मराठीत निर्माण केली आहेत. इतकेच नाही, तर शंकर महादेव, सुनिधी चौहान यांना मराठी गाणी गायला लावली. अजय-अतुल यांनी मराठीबरोबरच हिंदी, तेलगू, इंग्रजी गाण्यांनाही संगीत दिलंय.
लहानपणापासून आम्ही स्वतःकडे संगीतकार म्हणून पाहतोय, असे ते सांगतात. तुमचं काम बोललं की तुम्हाला संघर्ष कमी करावा लागतो. त्यामुळेच कोणत्याही गाण्याला संगीत देताना ते तंत्र आणि दर्जा या दोन्ही पातळ्यांवर अत्युच्च असावे, असा आमचा प्रयत्न असतो. असं संगीत निर्माण करताना आम्ही स्वतःशीच स्पर्धा करीत असतो, त्यामुळेच दर्जेदार सृजन होतं, अशी अजय-अतुलची धारणा आहे. अभिरुची उच्च असेल, तर तुमचा विचारही तितकाच परिपक्व असतो. यातून निर्माण होणारी कलाकृती ही परमोच्च आनंद देणारीच असते. अजय-अतुल याच श्रेणीतील आहेत.

Sunday, July 27, 2008

कर लो "दुनिया' मुठ्ठी में

रुपेरी पडद्यावरील तारे-तारकांचं उंची राहणीमान, महागड्या गाड्या, तारांकित हॉटेलमधील त्यांच्या पार्ट्या यामुळे चित्रपट व्यवसाय बक्कळ पैसा कमावण्याचं साधन आहे, असा साधारण समज आहे. बहुतांशी तो खराही आहे. चित्रपट डब्यात गेल्यामुळे काही जण देशोधडीला लागल्याचीही उदाहरणं आहेत; पण ती अपवादात्मक आहेत. आता तर चित्रपटसृष्टी इंडस्ट्री झाली. त्यात छोटा पडदाही आलाच. या इंडस्ट्रीत सध्या बूम असली, तरी स्पर्धाही तितकीच तीव्र आहे. टीव्हीचं माध्यमही चित्रपटांशी सर्वार्थानं स्पर्धा करू लागलं आहे. म्हणूनच की काय, अमिताभपासून शाहरूख खानपर्यंत अनेक बडे कलाकार छोट्या पडद्यावर दिसू लागलेत. "कौन बनेगा करोडपती' आणि "पॉंचवी पास' ही त्याची दोन खास उदाहरणं.पूर्वी, रुपेरी पडद्यावर जम बसलेला कलाकार टीव्हीवरील मालिकेत काम करताना दिसत नसे. अभिनयाच्या क्षेत्रात नव्यानं पाऊल ठेवणारांचं हे माध्यम, असं समजलं जायचं; पण एकामागोमाग एक असंख्य चॅनेल्स उगवली. त्यानंतर चित्र पालटलं. या चॅनेल्सवरील महिनोन्‌ महिने चालणाऱ्या मालिका, त्याला लोकांचा मिळणारा प्रतिसाद उद्योगजगतानं हेरला. आपल्या कंपनीची उत्पादनं घराघरांत नेणारं साधन म्हणून कॉर्पोरेट क्षेत्रानं टीव्हीकडे पाहिलं. जाहिरातींचा भडिमार सुरू झाला आणि वाहिन्यांचं अर्थकारण बदलून गेलं.असंख्य मालिका, नवे चित्रपट, त्यात पाच-पाच मिनिटांना दाखविल्या जाणाऱ्या जाहिराती याविषयी थोडा विचार केला, तर छोट्या पडद्यामागील अर्थकारण चक्रावून टाकतं. रुपेरी पडद्याची तर गोष्टच निराळी. त्यामुळेच मोठे उद्योगपतीही टीव्ही चॅनेल्स, मालिका, चित्रपट यामध्ये प्रचंड गुंतवणूक करताहेत.उद्योजक अनिल अंबानी आणि अमिताभ बच्चन यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहेच; परंतु हे दोघं आता व्यावसायिक भागीदार झाले आहेत. अनिल यांची "रिलायन्स बिग एन्फोटेन्मेंट' आणि "एबी कॉर्प्स' या कंपन्यांमध्ये तब्बल दीड हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे. या दोन्ही कंपन्या संयुक्तपणे चित्रपट, मालिका, रिऍलिटी शोची निर्मिती करणार आहेत. अर्थातच आर्थिक बाजू अनिल अंबानींकडे आणि दर्जेदार चित्रपट आणि कार्यक्रमांच्या निर्मितीची जबाबदारी अमिताभ यांना सांभाळावी लागणार आहे. करारानंतर या दोन्ही कंपन्या केवळ छोटा आणि मोठा पडदा यापुरत्या मर्यादित राहणार नाहीत, तर इंटरनेट आणि मोबाईल वापरणारा मोठा वर्गही त्यांना काबीज करायचा आहे. त्यांचा व्यवसाय इन्फोटेन्मेंट स्वरूपाचा असेल. ते केवळ एका भाषेपुरतेही मर्यादित राहणार नसून, हिंदीबरोबरच मराठी, तमीळ, कन्नड, बंगाली, तेलगू आणि पंजाबी भाषांतही चित्रपट आणि टीव्हीशी संबंधित कार्यक्रमांची निर्मिती केली जाणार आहे.निर्मितिमूल्य उच्च राहावं यासाठी "रिलायन्स'नं श्‍याम बेनेगल, अमोल पालेकर, संगीत सिवन, रितुपर्ण घोष, मधूर भांडारकर, प्रियदर्शन आदी दिग्गज दिग्दर्शकांना करारबद्ध केलंय. मोठी स्वप्नं पाहून ती साकार करण्याची अंबानी कुटुंबाची परंपरा आहे. त्यामुळे अनिल यांनी केवळ बॉलिवूड नव्हे, तर हॉलिवूडवरही लक्ष केंद्रित केलंय. प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्याबरोबर अनिल यांनी करार केला असून, हॉलिवूडमध्ये ते 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत, असं म्हणतात. हे खरंही असेल; कारण "कर लो दुनिया मुठ्ठी में' असं अंबानींचं ब्रीद आहे.

Friday, July 25, 2008

खबऱ्याची 'खबर'

'असली' डॉन ते नवा कॉन्ट्रॅक्‍ट व्हाया "रिमिक्‍स' डॉन. बॉलिवूडचा हा प्रवास पाहिला तर अनेक चित्रपटनिर्माते, दिग्दर्शकांना गुन्हेगारी विश्‍वाची भुरळ पडल्याचे लक्षात येते. (आता तर बॉलिवूडची अंडरवर्ल्ड कनेक्‍शन्सही उजेडात आली आहेत.) तद्वत प्रेक्षकांनाही अंडरवर्ल्डचे नेहमीच कुतूहल राहिल्याने या विषयावरील चित्रपट गल्लाभरू ठरणार, याची पक्की खात्री निर्मात्यांना असते. त्यामुळेच अंडरवर्ल्डचे काळे जग दाखविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. "डॉन', "धर्मात्मा', "सत्या', "कंपनी', "ब्लॅक फ्रायडे', "रिस्क', "शूट आउट ऍट लोखंडवाला' आदी चित्रपटांतून अंडरवर्ल्डचा कारभार प्रेक्षकांपुढे आला. "ब्लॅक फ्रायडे', "शूट आउट...' हे तर सत्यघटनेवर आधारित आहेत. "कंपनी'ही त्याच पठडीतला. (राम गोपाल वर्माला मात्र ते मान्य नाही.) या चित्रपटात दोन "डॉन'मधील संघर्ष दाखवलाय. "कंपनी' म्हणजे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यातील संघर्षाची कथा असल्याचे म्हटले गेले. (खरेखोटे रामू जाणे!)अंडरवर्ल्ड म्हटले की गुंड, पोलिस आणि एन्काऊंटर असे चित्र चटकन समोर येते. यात बाजूला राहतो, तो गुंड आणि पोलिस यांच्यातील चकमकींना कारणीभूत ठरणारा खबऱ्या. आजवर अनेक एन्काऊंटर स्पेशालिस्ट निर्माण झाले. त्यांचे नाव झाले. पैसा, ग्लॅमर त्यांना मिळाले; पण गुंडांची योग्य वेळी खबर देऊन पोलिसांना मदत करणारा "टिपर'/ "इन्फॉर्मर' मात्र खबरीपुरताच मर्यादित राहिला. या विषयावरच दिग्दर्शक मणिशंकर एक चित्रपट घेऊन येतोय. त्याचं नाव आहे "मुखबीर.' म्हणजे खबऱ्या. लवकरच तो प्रदर्शित होईल. मणिशंकर हा गुणी दिग्दर्शक आहे. चाकोरीबाहेरच्या विषयांची हाताळणी हे त्याचे वैशिष्ट्य. यापूर्वी "टॅंगो चार्ली' चित्रपटातून सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), त्यातील जवानांचे जीवन त्याने जगासमोर आणले. आता खबरे कसे निर्माण होतात- केले जातात, कोण असतात ते, गुंडाची माहिती देणे जीवघेणे ठरू शकते हे माहीत असूनही ते पोलिसांना का मदत करतात, या आणि अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे "मुखबीर' देईल, अशी अपेक्षा आहे. या चित्रपटाद्वारे मणिशंकरने एक वेगळा विषय हाताळला आहे. खबऱ्याची "खबर' घेणारा "मुखबीर' एकदा तरी पाहायला हवा.

Thursday, July 17, 2008

इहलोकीचा गंधर्व

बड्या शास्त्रीय गायकांच्या रेकॉर्डमधील गाणं तो अगदी जसंच्या तसं म्हणत असे. अचूक स्वरस्थाने, स्वरलगाव, तानांची फेक अगदी सारखं. लहान वयातील त्याच्या या हुशारीचे घरातल्यांबरोबरच इतरेजनांनाही अप्रूप वाटे. कुठलीही रेकॉर्ड एकदा ऐकली की दुसऱ्यांदा ती हुबेहूब गाऊन दाखवायची इतकी त्याची बुद्धी कुशाग्र होती. एका मोठ्या गुरूकुलातील गुरूंना त्याचे गाणं ऐकविण्यात आले. त्यांनाही या लहानग्याच्या स्वरांनी तृप्त केलं. त्याची लहान वयातील तयारी, प्रचंड ग्रहणशक्ती पाहून ते गुरू प्रसन्नचित्त झाले. त्यांनी त्याला सोन्याचे पदक बक्षीस दिलं. त्यावर कोरलं होतं "कुमार गंधर्व'. तो होता शिवपुत्र कोमकली.
शिवपुत्रची मैफल रंगविण्याची क्षमता असल्याने वडील सिद्धरामय्या यांनी "कुमार गंधर्व आणि पार्टी' अशी संस्था स्थापन केली. अनेक मैफली झाल्या. छोट्या कुमारच्या असामान्य कुवतीचे कौतुक सर्वत्र होत होते. वयाच्या सातव्या वर्षापासून सुरू झालेल्या या मैफली पुढे तीन-चार वर्षे सुरू होत्या. पण रेकॉर्डमधील गाण्यांचे अनुकरण किती दिवस करीत राहणार, असा विचार सिद्धरामय्यांनी केला आणि कुमारला शास्त्रीय संगीताची तालीम देण्याचे ठरविले. गुरूचा शोध सुरू झाला. यादरम्यानच (1935) छोट्या कुमारला प्रयाग संगीत परिषदेतर्फे आमंत्रण आले. कुमारने या मैफलीत एका रेकॉर्डमधील गाणं सादर केलं. मैफलीस खॉंसाहेब फय्यायखॉं, प्रा. बी. आर. देवधर यांच्यासारखे कलाकार हजर होते. तेही कुमारच्या गाण्यानं भारावून गेले. पुढे संयोगाने देवधर गुरुजींकडेच छोट्या कुमारचे गायनाचे शास्त्रीय शिक्षण सुरू झाले. रामनियम, बंदिश पेश कशी करावी, बंदिशीच्या अंगाने रागविस्तार कसा करावा, बोलतानाची उपज, तानेची फेक या शास्त्रोक्त तरकिबींचे शिक्षण देवधर गुरुजींनी कुमारला दिले. संगीतातील शास्त्र आणि कला यांच्या सांगड घालून मैफल मांडणीची खासियत, काही पथ्ये याचा परिपूर्ण विचार करायला प्रवृत्त करणारा अद्वितीय गुरू कुमार गंधर्वांना लाभला. तर कुमारजींच्या रूपाने असामान्य प्रतिभेचा शिष्योत्तम देवधर गुरुजींना मिळाला. चांगल्या गुरूला चांगला शिष्य आणि चांगल्या शिष्याला चांगला गुरू मिळणे, हा संयोग असतो. देवधर गुरुजी आणि कुमार गंधर्व या दोघांनाही हे भाग्य लाभलं!
पं. कुमार गंधर्वांनी संपूर्ण जीवन संगीत कलेस समर्पित केलं. परंपरेतील संगीतातून स्वनिर्मित सर्जनशील गायनशैलीची उभारणी करून संगीतात परंपरा आणि नवता यांचा संगम त्यांनी साधला. म्हणूनच कुमार गंधर्वांना संगीतक्षेत्रात नवसर्जनतेचे प्रणेते मानले गेले. कुमारजींची गायकी आत्मप्रचितीतून विकसित झाली. तिच्यात उत्स्फूर्तता होती. म्हणूनच ती उत्कट चैतन्य निर्माण करणारी ठरली. स्वरलयीशी एकरूपता हा कुमार गायकीचा धर्म आहे. त्यामुळेच स्वराशी एकनिष्ठ राहून तादात्म पावण्याचे परमोच्च सुख देणारी शक्ती म्हणजे कुमार गंधर्व शैली, असे म्हटले गेले.
संगीत कलेविषयी कुमारजींची मते स्पष्ट आणि परखड होती. कलेचा हेतू अभिव्यक्ती आहे. कला साधता आली पाहिजे. कलाकार कला अभिव्यक्त करतो तेव्हा त्याला रसिकांशी संवाद साधता येणे आवश्‍यक आहे. अभिजात संगीत समजून घेतले तरच त्याचा आस्वाद आणि त्यातील चिरंतन आनंद श्रोत्यांना मिळतो, ही देवाणघेवाण कलाकार-श्रोत्यांत असावी. गायकीतील आक्रमकता म्हणजे जोरकस स्वर लावून गाणे, असा नसून स्वरामधील आघातानुसार गायकीतील आशय समजावून देण्याची खासियत आहे, असे ते मानत. कोणत्याही रागाकडे कुमारजींनी पूर्णरुपाने पाहिले. राग ही चालती-बोलती माणसे आहेत, अशी त्यांची धारणा होती.
संगीताचा उगम लोकसंगीतात आहे, असे कुमारची म्हणत. त्यांनी प्रचंड सांगीतिक शोधकार्य केले. 1948च्या दरम्यान कुमारजी मध्य प्रदेशातील देवास येथे स्थायिक झाले. तिथे माळवी लोकसंगीत त्यांना ऐकायला मिळाले. माळव्याच्या लोकगीताइतकी श्रीमंती दुसऱ्या लोकगीतात नाही, असे कुमारजी कौतुकाने सांगत.
माळवा प्रांतातील अनेक गावातील बायका लोकगीत गात असत. अशा असंख्य लोकधुना कुमारजींनी मिळविल्या. त्याचे स्वरलेखन केले. ज्या धुनांमध्ये रागबीजे आढळली, अशा धुनांमधून त्यांनी राग निर्माण केले. कुमारजी त्याला धुनउगम राग म्हणायचे. मालवती, मधुसुरजा, राही, भवमत भैरव, सहेली तोडी, बीहड भैरव असे ते धुनउगम राग आहेत. गांधी मल्हार, गौरी बसंत, केदारनंद, चैतीधूप, रतीवैभव, दुर्गा केदार, धनबसंती, कामोदवंती, अशा शास्त्रउगम (पारंपरिक रागातून) रागांची निर्मितीही कुमार गंधर्वांनी केली. त्यांच्या अपार कष्टातून ही नवनिर्मिती झाली. नवनिर्मिती हा त्यांच्या आत्मशोधनातला सततचा ध्यास होता. या ध्यासातून जे सृजन झाले तेच कुमार गंधर्व!

Saturday, July 12, 2008

आव्हान आहे अभिजातता जपण्याचं



""गेल्या पंचवीस वर्षांच्या तुलनेत संगीतक्षेत्र अधिक विस्तारले आहे. शास्त्रीय संगीताचा प्रवाहदेखील अखंडित आहे. फक्त त्याची अभिजातता टिकविणे, हे मोठं आव्हान आहे. ते पेलण्याची जबाबदारी केवळ कलाकाराचीच आहे.''
प्रख्यात शास्त्रीय गायक शौनक अभिषेकी यांची मुलाखत घेण्याची योग आला. शास्त्रीय संगीताविषयी आपली मते त्यांनी ठामपणे मांडली. मुलाखतीचे स्वरूप प्रश्‍नोत्तरी असले, तरी प्रश्‍न वाचण्याचा जाच नको म्हणून उत्तरांची सुसूत्र बांधणी करून लिहिलेला लेखबंध...

शास्त्रीय संगीत हे नेहमीच मर्यादित स्वरूपाचं राहिलं आहे. यापुढेही ते मर्यादित स्वरूपाचंच राहील. कारण सवाई गंधर्वसारखे फार कमी कार्यक्रम असतात. ज्यात दहा-पंधरा हजार रसिक एकावेळी संगीताचा मजा घेऊ शकतात; परंतु मैफलीत मोजके लोक आणि कलाकार यांच्यात "इंटरॅक्‍शन' होते. एक भावबंध तयार होतो. मोठ्या कार्यक्रमांमधून तो तयार होईलच, असे नाही म्हणूनच शास्त्रीय संगीत मैफल स्वरूपातच राहील. त्याचं एक कारण आहे. शास्त्रीय संगीताचा बंध अध्यात्माशी आहे. बाबा (पं. जितेंद्र अभिषेकी) सांगायचे जो वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ आहे, तोच शास्त्रीय संगीताची लज्जत घेऊ शकतो. सर्वसाधारण पुस्तके, कादंबऱ्या कुणीही वाचतो; पण ज्याला शेक्‍सपिअर किंवा कालिदास वाचायचा आहे, त्याला प्रथम आपली वैचारिक बैठक तयार करावी लागते. शास्त्रीय संगीताचंही तसंच आहे म्हणूनच या संगीताला मिळणारा प्रतिसाद ठीक आहे.
माध्यमांमुळे आता संगीतक्षेत्राला इतकं एक्‍स्पोजर मिळालं आहे, की संगीताच्या इतर धारांप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकांचा प्रतिसाद मिळावा, असं वाटतं. पण शास्त्रीय संगीताच्या मैफलीसाठी आवश्‍यक संवादी आंतरक्रियेच्या मर्यादेमुळे तसं होणार नाही. नवी पिढी शास्त्रीय संगीत आत्मसात करण्याचा-ऐकण्याचा प्रयत्न करते आहे. मी महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेरही फिरतो. त्यावरून तरी मला सध्याचे चित्र आशादायी वाटतं.
पूर्वी पं. जितेंद्र अभिषेकी, भीमसेन जोशी, कुमारगंधर्व अशी मोजकी नावे लोकांसमोर होती. "एचएमव्ही' ही एकच कंपनी होती. त्यामुळे कलाकाराची एक रेकॉर्ड निघाली तरी त्याचं नाव देशभर व्हायचं. आज माध्यमांमुळे अनेक लोक संगीतक्षेत्राकडे वळल्याने चांगलं काय, वाईट काय - काय ऐकायचं, असा प्रश्‍न लोकांसमोर आहे. त्याचा परिणाम शास्त्रीय संगीताला ज्या कलाकारांनी वाहून घेतलं आहे, त्यांच्यावर होतो. प्रायोजक संस्थाही नावाजलेल्या कलाकाराचेच कार्यक्रम आयोजित करणे पसंत करतात. मग प्रश्‍न असा पडतो की नव्या पिढीतील जे कलाकार शास्त्रीय संगीताची सेवा करतात, त्यांना स्टेज कसं मिळायचे. साधनेसाठी त्यांनी काही वर्षे घालविली, याचा विचार कोण करणार? एखाद्या कलाकाराचे नाव झाल्यानंतरच लोक त्याला पैसे देणार का? कलाकाराला त्याच्या साधना-संघर्षाच्या काळात उत्तेजन, आर्थिक पाठबळ मिळायला पाहिजे. तुलनेने माझ्या पिढीची स्थिती बरी आहे. पंधरा वर्षांपूर्वी, आम्ही "गाणं करतो म्हटलं की म्हणजे काय' असा प्रश्‍न यायचा. शास्त्रीय संगीत अशी एक कला आहे, की ती प्रत्येक गावात-शहरात जाऊन पेश करावी लागते. पहिला पंधरा वर्षांचा काळ कलाकारासाठी महत्त्वाचा असतो. त्याला साथ, मदत-आधार मिळणे आवश्‍यक आहे. या काळात तो झगडत-भोगत राहिला, तर पुढे त्या कलाकाराचे नाव मोठं झाल्यानंतर तो मनमानेल तसे मानधन मागेल आणि संघर्षाच्या काळात झालेल्या अत्याचाराचा सूड उगवेल. यात संगीतक्षेत्राची मोठी हानी होण्याचा धोका आहे. कलाकाराला आर्थिक सुरक्षितता मिळाली, तर संगीतक्षेत्रासाठी ते अधिक फलदायी ठरेल.
पूर्वीची गुरुकुल पद्धत खुंटल्याचा सध्या सूर उमटत आहे. ते बहुतांशी खरंही आहे. गुरुकुल पद्धतीला शास्त्रीय संगीतात पर्याय नाही. आजवर याच परंपरेतून कलाकार तयार झालेत. आजही अगदी छोट्या स्तरावर का होईना गुरूकुलाची परंपरा सुरूच ठेवली तर हिऱ्यासारखे कलाकार तयार होतील. बाबांनी सुरू केलेली गुरुकुल परंपरा मीदेखील पुढे सुरू ठेवली आहे.
सध्या लोकांचा कल मनोरंजकी कलांकडे असल्याने संगीत नाटकांची परंपरा खंडित झाली आहे. याला संगीतकारही तितकेच जबाबदार आहेत. पूर्वी लेखक-संगीतकार आणि निर्माता यांच्या वैचारिक देवाणघेवाणीतून संगीत नाटकांची निर्मिती केली जायची. संगीत नाटकाचा परिणाम पुढे किमान दहावर्षे जनमानसावर टिकून राहावा, हा विचार त्यावेळी केला जायचा. त्याच दृष्टिकोनातून संगीतकारही मेहनत घेऊन संगीत देत असत म्हणूनच ती नाटके आज लोकांच्या स्मरणात आणि त्यातील संगीत लोकांच्या ओठात आहे. आज लेखक, संगीतकार, निर्माते आपल्या "व्यवसाया'त मग्न झाल्याने त्यांच्यातील वैचारिक देवाणघेवाण पूर्णपणे थांबलेली आहे. त्यामुळेच अशाप्रकारची निर्मिती होत नाही.
नवी पिढी शास्त्रीय संगीताला प्रतिसाद देत आहे. फक्त या प्रतिसादाचा प्रवाह व्हायला हवा. हा प्रवाह निर्माण करण्याची जबाबदारी कलाकाराची आहे. बाबा, भीमसेन जोशी, किशोरी अमोणकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपलं नाव चाळीस वर्षे एकाच उंचीवर ठेवलं. रसिकांच्या प्रतिसादाचा त्यांनी प्रवाह निर्माण केला. तीच जबाबदारी आता आमच्यावर आहे. नव्या पिढीनेही आपल्या मुलांमध्ये सांगीतिक गुण असतील, तर त्याला पूर्णवेळ संगीत शिकण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. शास्त्रीय संगीत थांबलय का, या प्रश्‍नावर मी एक दाखला देतो. बाबांच्या काळातही आता शास्त्रीय संगीत काही तरणार नाही, असे लोक म्हणत. त्यानंतर पंधरा-वीस वर्षे गेली संगीत काही थांबलं नाही आणि थांबणारही नाही.

Friday, July 11, 2008

"रिऍलिटी'तील वास्तव

एका बंगाली दूरचित्रवाहिनीवरील नृत्यस्पर्धेत शिंजीनी नामक स्पर्धक मुलीला अपयशामुळे नैराश्याचा झटका आला. या स्पर्धेतील एक प्रसंग तिच्या जिवावर बेतला. यासंबंधीच्या बातम्या दूरचित्रवाहिनी आणि दैनिकांत झळकल्या आणि अशाप्रकारच्या सर्वच कार्यक्रमांना, निर्मात्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले. वस्तुतः ते चूक आहे. खरे तर या घटनेला शिंजीनीच्या कुटुंबीयांना जबाबदार ठरवायला हवे. आपल्या अपत्याला आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण किती धीर देतो, यावर मुलांची मानसिकता घडत असते. केवळ अतोनात लाड करून त्यांना हवे ते, हवे तेव्हा देऊन हट्टी बनविणे किंवा अपयश काय आहे, हेच त्यांना कळू देणार नसाल, तर अशा मुलांच्या वाट्याला शिंजीनीसारखीच अवस्था येणार. पालकांनी अशा मुलांना "रिऍलिटी शो'मध्ये ढकलू नये.कला कोणतीही असो, ती आत्मसात करण्यासाठी अपार मेहनत करावी लागते. त्यासाठी कष्टाळू वृत्ती मुलांमध्ये असायला हवी. ती काही उपजत नसते. "आई-बाबां'ना मुलांमध्ये ती निर्माण करावी लागते. कष्टाळू वृत्ती एकदा अंगी आली, की अपयश पचविण्याचा कसदारपणा मुलांमध्ये आपोआप निर्माण होतो. "प्रथम अपयश आणि नंतर यश' हे साधे सूत्र जरी मुलांच्या गळी उतरविले, तरी पुष्कळ आहे. परंतु "माझा मुलागा इतरांपेक्षा खूप हुशार आहे. यश घेऊनच तो जन्माला आलाय; अपयश त्याला माहीतच नाही, ' हे सांगण्याची चढाओढ सध्याच्या "आई-बाबां'मध्ये दिसते. मुलांकडे तटस्थ वृत्तीने पाहून त्यांच्यातील गुण-दुर्गुण ओळखण्याची "हिम्मत' पालकांकडे नसेल तर मुलेही तकलादू मनोवृत्तीची बनतील.कार्यक्रमांना दोष नकोकोलकत्याच्या शिंजीनीला "अक्यूट डिसएमिनेटेड एन्सेफेलो मियालिटीज' रोग जडल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. तिच्या कमकुवत मनोवस्थेमुळे तिला जास्त त्रास झाला. शिंजीनीच्या या अवस्थेबद्दल तिच्या कुटुंबीयांनी कुणालाही जबाबदार धरले नाही; पण प्रसारमाध्यमांनी मात्र "रिऍलिटी शो' आणि त्यातील परीक्षकांना धारेवर धरले. "रिऍलिटी शो'चा हेतू विविध क्षेत्रातील दडलेले "हिरे' शोधून काढण्याचा आहे. त्यात स्पर्धा असणारच! या शोद्वारे अमाप पैसा कमावला जातो हेही मान्य; पण नव्या कलाकारांना इतके सशक्त व्यासपीठ कुठे मिळू शकणार आहे? आताच्या दिग्गज कलाकारांना असे व्यासपीठ क्वचितच मिळाले असेल! हे वास्तव प्रत्येकानेच स्वीकारायला हवे. आणि स्पर्धा कुठे नसते? घरात सकाळी उठल्यानंतर दादू आधी अंघोळ करणार की ताई, बाबांनी खाऊ आणला की बच्चे कंपनी आधी मला, आधी मला करायला लागतात. इथपासून स्पर्धा सुरू होते. मुले वर्षभर शाळेत जातात. या काळात शाळेत होणाऱ्या स्पर्धेत ते भाग घेतात. शेवटी वार्षिक परीक्षा असते. (ही सुद्धा एक स्पर्धाच नाही का? ) स्पर्धा, परीक्षांमध्ये कमी मार्क्स मिळाले, अपयश आले तर ते स्वीकारले जाते. त्यावेळी शाळा, शिक्षणसंस्था, शिक्षकांना दोष दिला जातो का, याचाही प्रत्येकाने विचार करावा. मग "रिऍलिटी शो'ला दोष का? हे शो म्हणजे नवकलाकारांच्या आयुष्याला दिशा देणारे आहेत, असा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवायला हवा. कारण या शोमध्ये यशस्वी झालेल्या अनेकांना आपल्या जीवनाचा मार्ग सापडला आहे.
-

Thursday, January 31, 2008

यशस्वी पुरुषामागे स्त्री (चांगली की वाईट)



















प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, अशी शब्दावली प्रचलित आहे; पण सकारात्मक अर्थाने! याचा अनुभवही अनेकांना आला असेल. पण एखाद्याची बायको किंवा प्रेयसी खाष्ट असेल तर, तो पुरुष यशस्वी होणारच नाही का? यावर प्रत्येकाची मते भिन्न असू शकतात. नव्हे असतीलच, यात शंका नाही. पत्नी खाष्ट आणि तऱ्हेवाईक असेल तर पती यशस्वी होणारच नाही, असे कुणाचे म्हणणे असेल तर अब्राहम लिंकनच्या आयुष्यात डोकवा म्हणजे डोक्‍यातील भ्रम दूर होतील. कुणी म्हणेल हा अपवाद आहे... (ज्याचा-त्याचा प्रश्‍न!)अब्राहम लिंकनची पत्नी मेरी टॉड अशीच खाष्ट आणि तऱ्हेवाइक होती. राग, द्वेष, चीड, हाव हे सर्व "गुण' तिच्या अंगी होते. त्यामुळे तिची जीवनकथाही वैचित्र्यपूर्ण आहे. मेरीच्या अंगी असलेल्या या "गुणां'मुळे लिंकनला तोटाचा झाला असेल, असा दावाही कुणी करू शकते. काही बाबतीत तो खराही ठरेल. पण तिचा त्रास असूनही लिंकन अमेरिकाचा अध्यक्ष झाला, हीदेखील वस्तुस्थिती आहे. यावरून एकतर उपरोक्त शब्दावली बाद ठरवावी लागेल किंवा "कोणत्याही यशस्वी पुरुषामागे (चांगल्या/वाईट स्वभावाची) स्त्री असते' अशी शब्दावली रूढ करावी लागेल. असो. लिंकनच्या आयुष्यात डोकावले आहेच. त्याबाबत आणखी जाणून घेवू या.अब्राहम लिंकन हा अत्यंत गरीब होता. लाकूडतोड, शेतमजुरी, सुतारकी, बोटी धुणे, जमीनमोजणी, किराणा मालाचे दुकान चालविणे, असे अनेक धंदे त्याने केले. त्या उलट मेरीचे. ती धनिक कुटुंबात जन्मलेली आणि उच्चभ्रू शाळेत शिकलेली. आपण इतर अमेरिकन मुलींप्रमाणे नसून, अधिक गुणसंपन्न आहोत, अशी तिची समजूत होती. त्यामुळे दुसऱ्यांचे ऐकणे, इच्छांना मुरड घालणे तिला जमणे कधीच शक्‍य नव्हते. असे हे लिंकन आणि मेरी दोन टोकांवरचे! प्रामाणिकपणा आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणे, ही लिंकनची बलस्थाने होती. मेरी आणि लिंकन यांचा प्रेमविवाह. लिंकन दिसायला धड नव्हता. त्यामुळे मेरीच्या घरच्यांनाही हे लग्न मान्य नव्हते. पण त्याच्याकडे अशी काही कौशल्ये होती की त्या बळावर तो अमेरिकेचा अध्यक्ष होणार, याची मेरीला कल्पना होती. त्यामुळेच तिने लिंकनशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. (बापरे, केवढी ही दूरदृष्टी! प्रत्येक स्त्रीला पुरुषाच्या भविष्याचा अंदाज येऊ लागला तर..?) मेरीच्या अशा स्वभावामुळे तिच्याबरोबर आपला संसार होणार नाही, असे लिंकनला वाटत होते. त्याने मेरीला पत्र लिहिले, ""तू दिलेल्या विवाहाच्या प्रस्तावाचा मी विचार केला आहे; पण लग्न करण्याएवढे माझे तुझ्यावर प्रेम नाही. त्यामुळे लग्नाचा बेत आपण रद्द करू.'' लिंकनने हे पत्र लिहिले खरे; पण मेरीला त्याने तोंडीच नकार द्यावा, असा लिंकनच्या मित्रांचा आग्रह होता. यात बरेच दिवस गेले. नकार देण्याचा दिवस आला, त्यादिवशी लिंकन लग्नाला होकार देऊन बसला. लग्न झाल्यानंतर मेरी आणि लिंकन वसतिगृहात राहायला गेले. ते खानावळीत जेवत असत. मेरीला श्रीमंती थाटात जगायची सवय. तिला वसतिगृहातलं उपरं जीवन नकोसं झालं. ती सारखी कटकट, कुरकूर करू लागली. लिंकनवरही ती अनेकदा चिडत असे. एकदा तर रागाच्या भरात तिने लिंकनला गरम कॉफीचा कप फेकून मारला होता. (पुरुषांनो, बघा) अशा परिस्थितीतही लिंकन शांत राहात असे. आपण नवऱ्यावर रागावूनही तो काहीच बोलत नाही. प्रत्युत्तर देत नाही, याचा मेरीला भयंकर राग येत असे.ती अनेकप्रकारे लिंकनला छळत असे. त्याच्या वागण्या-बोलण्यातले दोष दाखवून त्याला हिणवत असे. माणसाने कसे ताठ, छाती पुढे काढून चालावे, चालीत जोश, शान असावी, असे ज्ञान ती लिंकनसमोर पाजळत असे. तुझे कान फताडे आहेत, नाक वाकडं आहे. तू ताड-माड आहे. तुझं डोकं फार लहान दिसतं-एखाद्या लांब काठीवर लहान भांडं ठेवल्यासारखं वाटतं, अशा बोचणाऱ्या शाब्दिक टपल्याही ती मारत असे. मेरीच्या अशा बोलण्याने लिंकन दुखावला जायचा; पण त्याने कधी मेरीवर राग काढला नाही. (किती ही सहनशीलता? आहे एवढी कुणाकडे?)मुलगा झाल्यावर लिंकनने घर विकत घेतले. घर अतिशय टुमदार होते; पण तेही मेरीला आवडले नाही. म्हणून ती त्या घराला "दीड मजली' घर म्हणत असे. लिंकनच्या गृहजीवनाविषयी त्याच्या मित्रांना कल्पना होतीच; पण मेरीची आरडाओरड, आदळआपट हे परिसरातील लोकांनाही परिचयाचे झाले होते. मेरीच्या अशा स्वभावामुळे लिंकन सहसा कुणाला घरी बोलावत नसे. मेरी असे वागत होती; परंतु लिंकनच्या मनात तिच्याविषयी कायमच ओढ आणि प्रेम दाटून असायचे. किंबहुना मेरीलाही लिंकनविषयी थोडे की होइना प्रेम होते, असे म्हणावे लागेल. कारण त्यांच्यातील पती-पत्नीचे नाते शेवटपर्यंत टिकून राहिले. मेरी आणि लिंकन यांच्यातील विचारविश्‍व सर्वस्वी भिन्न होते. मेरीला राजकारणात रस होता. चैनीची तिला भयंकर हौस होती आणि सामाजिक प्रतिष्ठेची हावही! तर लिंकन अतिशय प्रामाणिक. गरीबीची जाणीव असल्याने काटकसरी होता. दोघांच्या विचारसरणीतील भेदामुळेच कदाचित मेरी लिंकनला त्रास देत असावी. मेरीच्या अशा विक्षिप्त स्वभावाचा लिंकनच्या भवितव्यावर काडीचाही परिणाम झाला नाही. तो अमेरिकेचा अध्यक्ष झालाच. किंबहुना मेरीने त्याचा संसार नेटका (शांतपणे) केला असता, तर कुणी सांगावे लिंकन जन्मभर वकील म्हणूनच जगला असता...
आता मेरीला काय म्हणणार, चांगले की वाईट?

Tuesday, January 29, 2008

पाकिस्तानात संगीताला विरोध म्हणजे "आटे में नमक'

पाकिस्तानात संगीताला विरोध म्हणजे "आटे में नमक'

पाकिस्तान हा भारताचा कधीकाळी भाग होता. फाळणीनंतर आता तेथील संगीताची स्थिती काय असेल, याबाबत माझ्या मनात नेहमीच कुतूहल आहे. मी खरेतर जातीभेद मानत नाही; परंतु शास्त्रीय संगीत समृद्ध करण्यात मुस्लिम कलाकारांचा मोलाचा वाटा आहे, असे माझे ठाम मत आहे. पाकिस्तान आज अराजकाच्या गर्तेत सापडला आहे. तेथील सांस्कृतिक क्षेत्राला मूलतत्त्ववाद्यांपासून धोका निर्माण झाला आहे. तेथील संगीताबद्दल खास करून शास्त्रीय संगीताबद्दल कुतूहल आहे. प्रख्यात गझल गायक मेहदी हसन यांचे चिरंजीव असिफ मेहदी मैफलीसाठी नुकतेच पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे परस्परांविषयीची दृष्टिकोन बदलले आहेत. त्याप्रमाणे संगीत क्षेत्रही बदलले आहे का, तेथील सांगीतिक माहोलमध्ये काही फरक पडलाय का, असं विचारल्यावर असिफ म्हणाले, ""संगीताची उत्पत्ती हीच मुळात भारतात झाली आहे. पाकिस्तानचेही तसेच आहे. त्यामुळे संगीतात फारसा बदल झालेला नाही. भारतात जे शास्त्रीय संगीत-रागरागिण्या आहेत. त्याच तिथे आहेत; परंतु भारतात संगीताला "मजाक' समजले जात नाही. या संदर्भात मला भारत आणि पाकिस्तानच्या संगीतात थोडा फरक जाणवतो. बाकी सगळे सारखेच आहे. माहोलही सारखाच आहे.'' भारतात संगीत आणि कलाकाराला भरपूर मानसन्मान मिळतो. तसा पाकिस्तानातील कलाकारांना मिळत असेल का? संगीत क्षेत्राकडे पाहण्याचा सरकार आणि लोकांचा दृष्टिकोन कसा असेल, याविषयी मला जाणून घ्यायचं होतं... ""पाकिस्तानमध्येही खूप आवडीने संगीत ऐकले जाते. त्यामुळे जनता आणि सरकारकडूनही प्रोत्साहन दिले जाते. मानसन्मान मिळतो. याचे एक चांगले उदाहरण म्हणजे मेहदी हसन आहेत. तिथे आजही ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत,'' असं असिफनं मला सांगितलं. गझल गायकी हा उपशास्त्रीय संगीताचा प्रकार आहे; पण सध्या त्याला "सुगम संगीता'चे स्वरूप आले आहे, या माझ्या मतावर आसिफनंही होकाराचा शिक्का मारला. ""आज-काल गझल म्हणून जे गायले जाते त्याला गझल नव्हे; गीत म्हणायला हवे. गझलचा जो "मिजाज' आहे त्यात भाव, शब्द आला महत्त्व आहे. शास्त्रीय संगीताची जानकारी असणेही तेवढेच आवश्‍यक आहे. ती नसेल तर गझलेचा भावार्थ लोकांपर्यंत पोचविता येणारच आहे. आज जे गायले जात आहे, ती गझल नाही.'' ही असिफची स्पष्टोक्ती! आजचे संगीत "ग्लोबल' झाले आहे. "फ्युजन'चा जमाना आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत किंवा आशियाई संगीत यात पॉप, रॉक आदींचा वापर वाढू लागला आहे. याचा शास्त्रीय संगीतावर काही परिणाम होईल, अशी भीतीसंगीताचा विचार करणारा प्रत्येकजण उगाचच करीत असतो. माझ्या भीतीवर असिफनं फार मार्मिक उत्तर दिलं, ""शास्त्रीय संगीतावर कोणताच परिणाम होणार नाही. कारण ते सत्य आहे. सत्य हे चिरंतन असते. संगीत क्षेत्रातील "फ्युजन' निश्‍चितच चांगले आहे. त्यातून चांगले संगीतच आपल्याला मिळेल. एक उदाहरण देतो. पूर्वी उपचारासाठी संगीताचा वापर केला जायचा-आजही केला जात आहे. माझे आजोबा इस्माईल खॉं हे "जिल्फ' नावाचा राग गाऊन लहान मुलांची पोटदुखी बरी करायचे. भारतातील इंदूर संस्थानच्या महाराजांच्या पुतणीला कर्करोग होता. एका संगीतकाराने तानपुऱ्याच्या झंकाराने तिला बरे केले. संगीताचे हे माहात्म्य आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीत कधीही लोप पावणार नाही.'' पाकिस्तानात मूलतत्त्ववाद्यांचे वर्चस्व वाढत आहे. त्यांना संगीत मान्य नाही, असे बातम्यांमधून ऐकायला वाचायला मिळतं. सत्य जाणून घ्यायचं होतं म्हणून याविषयी मी असिफला विचारलं. ""पाकिस्तान हा इस्लामिक देश असल्याने तेथे अनेक लोक गायन-वादनाला चांगले मानत नाहीत. हे खरे आहे; परंतु लोकप्रियतेचा विचार केला तर तेथील नव्वद टक्के लोकांना संगीतात रस आहे. या प्रमाणातच आम्हालाही तिथे प्रतिसाद मिळतो. संगीत मान्य नाही, असे खूप कमी लोक आहेत. त्यांच्या तीव्रता "आटे में नमक' अशी आहे. या लोकांच्या विरोधामुळे पाकिस्तानातील संगीत कमी झालेले नाही. किंबहुना त्यात वाढच झाली आहे,'' अशी टिपण्णी असिफनं केली. त्यावर मी म्हटलं, अशा लोकांच्या विरोधामुळे संगीतकार, गायक यांच्यावर पाकिस्तान सरकारकडून बंधने लादली जातात का? असिफनं सांगितलं, ""अजिबात नाही. उलट कलाकारांना प्रोत्साहन देणे, हे तेथील सरकारचे धोरण आहे.''या संवादानंतर मेहदी हसन आणि स्वत:च्या काही अप्रतिम गझलाही असिफनं सादर केल्या.
क्‍या बात है?... मेहदी हसन यांचीच याद आली...!

Monday, January 21, 2008

पिया बिन नहीं आवत चैन...

भक्‍ती, प्रेम, विरह या भावना झिंझोटी राग व्यक्त करतो. पण झिंझोटीतील विरह आक्रोश करीत नाही आणि त्यातील प्रेमाला दिखाऊपणा नाही. या भावना एखाद्या विश्‍वासाच्या आधारावरच व्यक्त होतात. अब्दुल करीम खॉं यांची "पिया बिन नहीं आवत चैन' ही झिंझोटी रागातील ठुमरी त्याचे उत्तम उदाहरण आहे. या ठुमरीबद्दलची एक आठवण सैगलने आपल्या चरित्रात सांगितली आहे. खॉंसाहेबांची ही ठुमरी 1931 मध्ये रेकॉर्ड झाली आणि प्रचंड गाजली. त्यानंतर 1935 मध्ये हीच ठुमरी "देवदास' या चित्रपटात वापरण्यात आली. मात्र, ती गायली सैगलने! सैगलने अप्रतिम गायलेली ही ठुमरी खॉंसाहेबांच्या दोस्तांनी ऐकली आणि खॉंसाहेबांनीही ती ऐकावी, असा हट्ट त्यांच्याकडे धरला. खॉंसाहेबांनी आपल्या 63 वर्षांच्या आयुष्यात कधीही सिनेमा पाहिला नव्हता. परंतु, दोस्तांच्या आग्रहाखातर ते "देवदास' पाहण्यासाठी गेले आणि त्यातील सैगलने गायलेली ठुमरी ऐकून ओक्‍साबोक्‍शी रडले. झिंझोटीतील आर्तता आणि सैगलच्या गायकीतील भावार्तता यांना खॉंसाहेबांकडून मिळालेले हे एक प्रशस्तिपत्रच म्हणावे लागेल. सिनेमा पाहिल्यानंतर खॉंसाहेबांनी सैगलाचा पत्ता शोधला. एकदिवस त्याच्या घरी गेले आणि त्याला ती ठुमरी अनेकवेळा गायला सांगितली. पुन्हा भेटू म्हणून त्यादिवशी खॉंसाहेबांनी सैगलाचा निरोप घेतला. पुन्हा मात्र त्यांची कधीही भेट होऊ शकली नाही. पहिली भेट हीच त्यांची शेवटची भेट ठरली. कारण महिनाभरातच खॉंसाहेबांचे अचानक निधन झाले. पुढे 1938 मध्ये अलाहाबादला शास्त्रीय संगीत समारोह झाला. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या संगीत महोत्सवास हजेरी लावली. परंतु खॉंसाहेबांची अनुपस्थिती प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जात होती. त्यावेळी त्यांच्या आठवणीने व्याकूळ होऊन सैगलने "पिया बिन नहीं आवत चैन' ही ठुमरी पेश करून खॉंसाहेबांना आदरांजली वाहिली.

Sunday, January 13, 2008

धन्य ती गायनी कळा!


म्युझिक थेरपीचं खरं तर आज स्तोम माजविलं जात आहे, असं मला वाटतं कारण तेवढी जाण असलेले कलाकार आहेत का आणि जे आहेत ते असला उद्योग करतात का? हा खरा प्रश्‍न आहे. याविषयी मला एक किस्सा वाचलेला आठवतो. दगडाला "रडू' येणे म्हणजे काय असतं, याचा प्रत्यय हा किस्सा वाचल्यानंतर येतो....

दुसरे महायुद्ध सुरू होण्याआधी (1933) प्रख्यात शास्त्रीय गायक ओंकारनाथ ठाकूर एकदा युरोपमध्ये संगीत दौऱ्यावर गेले होते. याच दौऱ्यात त्यांना इटलीत जाण्याचा योग आला. मुसोलिनी त्यावेळी इटलीचा सर्वेसर्वा होता. त्याला भारतीय शास्त्रीय संगीत ऐकविण्याची ओंकारनाथांची इच्छा झाली. मुसोलिनीच्या सचिवामार्फत त्यांनी मुसोलिनीला गाणं ऐकविण्याची परवानगी मिळविली. पाच मिनिटात गाणं संपवायचे ही अट होती. पंडितजींनी ती मान्य करून मुसोलिनीसमोर तोडी राग गाण्यास सुरवात केली. वेळ संपत आली; पण मुसोलिनीला गायनाने भारावून गेला होता. त्यानं पंडितजींना खुणेनेच गात राहायला सांगितलं. तोडी सुरूच होता. या रागातील करुण स्वरांनी हुकूमशहा मुसोलिनी हेलावला. त्याचे डोळे पाण्याने डबडबले... पण असं विरघळून जाणं आपल्याला परवडणारं नाही, हे त्याच्या लक्षात आल्यावर त्यांनं ओकारनाथांना गाण थांबविण्याची विनंती केली. मुसोलिनीला निद्रानाश हा आजार होता. तोही पंडितजींच्या गायनाने बरा झाल्याचे सांगितले जाते.

Tuesday, January 8, 2008

पाकिस्तानात संगीताला विरोध म्हणजे आटे में नमक

राजकीय आणि सामाजिक समस्या पाकिस्तानात नेहमीच भेडसावत राहिल्या आहे. आता तेथील सांस्कृतिक क्षेत्राला मूलतत्त्ववाद्यांपासून धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानातील संगीत क्षेत्राची स्थिती नेमकी कशी आहे, याविषयी प्रख्यात गझल गायक मेहदी हसन यांचे चिरंजीव असिफ मेहदी यांच्याशी केलेली ही बातचीत. असिफ मेहदी सध्या पाकिस्तानहून पुण्यात आलेले आहेत.



  1. - भारत-पाक फाळणीनंतर या देशांचे परस्परांविषयीची दृष्टिकोन बदलले आहेत. त्याप्रमाणे संगीत क्षेत्रही बदलले आहे का, तेथील सांगीतिक माहोलमध्ये काही फरक पडलाय का?:


संगीताची उत्पत्ती हीच मुळात भारतात झाली आहे. पाकिस्तानचेही तसेच आहे. त्यामुळे संगीतात फारसा बदल झालेला नाही. भारतात जे शास्त्रीय संगीत-रागरागिण्या आहेत. त्याच तिथे आहेत. परंतु भारतात संगीताला "मजाक' समजलं जात नाही. यासंदर्भात मला भारत आणि पाकिस्तानच्या संगीतात थोडा फरक जाणवतो. बाकी सगळं सारखंच आहे. माहोलही सारखच आहे.





  • - भारतात संगीत आणि कलाकाराला भरपूर मानसन्मान मिळतो. तसा पाकिस्तानात मिळतो का? संगीत क्षेत्राकडे पाहण्याचा सरकार आणि लोकांचा दृष्टिकोन कसा आहे?


पाकिस्तानमध्येही खूप आवडीनं संगीत ऐकलं जातं. त्यामुळे जनता आणि सरकारकडूनही प्रोत्साहन दिलं जातं. मानसन्मान मिळतो. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे मेहदी हसन आहेत. तिथे आजही ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.





  • - गझल गायकी हा उपशास्त्रीय संगीताचा प्रकार आहे. पण सध्या त्याला "सुगम संगीता'चं स्वरूप आलंय. याबाबत आपलं मत काय आहे?


तुम्ही म्हणता ते खरं आहे. आज काल गझल म्हणून जे गायले जाते त्याला गझल नव्हे; गीत म्हणायला हवे. गझलचा जो "मिजाझ' आहे त्यात भाव, शब्द आला महत्त्व आहे. शास्त्रीय संगीताची जानकारी असणेही तेवढेच आवश्‍यक आहे. ही जानकारी नसेल तर गझलेचा भावार्थ लोकांपर्यंत पोचविता येणारच आहे. आज जे गायलं जात आहे, ती गझल नाही, असंच मी म्हणेल.





  • आजचं संगीत "ग्लोबल' झालंय. फ्युजनचा जमाना आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत किंवा आशियायी संगीत यात पॉप, रॉक आदींचा वापर वाढू लागला आहे. याचा शास्त्रीय संगीतावर काही परिणाम होईल, असे आपल्याला वाटते का?


शास्त्रीय संगीतावर कोणताच परिणाम होणार नाही. कारण शास्त्रीय संगीत सत्य आहे. सत्य हे चिरंतन असते. संगीत क्षेत्रातील "फ्युजन' निश्‍चितच चांगले आहे. त्यातून चांगलं संगीतच आपल्याला मिळेल, असं माझं मत आहे. एक उदाहरण देतो. पूर्वी उपचारासाठी संगीताचा वापर केला जायचा-आजही केला जात आहे. माझे आजोबा इस्माईल खॉं हे "जिल्फ' नावाचा राग गाऊन लहान मुलांची पोटदुखी बरी करायचे. भारतात इंदूर संस्थान होते. या संस्थानच्या महाराजांच्या पुतणीला कर्करोग होता. एका संगीतकाराने तानपुऱ्याच्या झंकाराने तिला बरे केले. संगीताचं हे माहात्म्य आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीत कधीही लोप पावणार नाही.





  • - पाकिस्तानात काही लोकांना संगीत मान्य नाही, असं बातम्यांमधून ऐकायला वाचायला मिळतं. सत्य काय आहे? आपण याबाबत काय विचार करता?


हे खरं आहे. पाकिस्तान हा इस्लामिक देश असल्याने तेथे अनेक लोक गायन-वादनाला चांगलं मानत नाहीत. परंतु लोकप्रियतेचा विचार केला तर तेथील नव्वद टक्के लोकांना संगीतात रस आहे. या प्रमाणातच आम्हालाही तिथे प्रतिसाद मिळतो. संगीत मान्य नाही, असे खूप कमी लोक आहेत. त्यांच्या तीव्रता "आटे में नमक' अशी आहे. या लोकांच्या विरोधामुळे पाकिस्तानातील संगीत कमी झालेले नाही. किंबहुना त्यात वाढच झाली आहे.





  • - अशा लोकांच्या विरोधामुळे संगीतकार, गायक यांच्यावर पाकिस्तान सरकारकडून बंधने लादली जातात का?


अजिबात नाही. उलट कलाकारांना प्रोत्साहन देणे, हे तेथील सरकारचे धोरण आहे.





- संतोष शाळीग्राम