Saturday, July 12, 2008

आव्हान आहे अभिजातता जपण्याचं



""गेल्या पंचवीस वर्षांच्या तुलनेत संगीतक्षेत्र अधिक विस्तारले आहे. शास्त्रीय संगीताचा प्रवाहदेखील अखंडित आहे. फक्त त्याची अभिजातता टिकविणे, हे मोठं आव्हान आहे. ते पेलण्याची जबाबदारी केवळ कलाकाराचीच आहे.''
प्रख्यात शास्त्रीय गायक शौनक अभिषेकी यांची मुलाखत घेण्याची योग आला. शास्त्रीय संगीताविषयी आपली मते त्यांनी ठामपणे मांडली. मुलाखतीचे स्वरूप प्रश्‍नोत्तरी असले, तरी प्रश्‍न वाचण्याचा जाच नको म्हणून उत्तरांची सुसूत्र बांधणी करून लिहिलेला लेखबंध...

शास्त्रीय संगीत हे नेहमीच मर्यादित स्वरूपाचं राहिलं आहे. यापुढेही ते मर्यादित स्वरूपाचंच राहील. कारण सवाई गंधर्वसारखे फार कमी कार्यक्रम असतात. ज्यात दहा-पंधरा हजार रसिक एकावेळी संगीताचा मजा घेऊ शकतात; परंतु मैफलीत मोजके लोक आणि कलाकार यांच्यात "इंटरॅक्‍शन' होते. एक भावबंध तयार होतो. मोठ्या कार्यक्रमांमधून तो तयार होईलच, असे नाही म्हणूनच शास्त्रीय संगीत मैफल स्वरूपातच राहील. त्याचं एक कारण आहे. शास्त्रीय संगीताचा बंध अध्यात्माशी आहे. बाबा (पं. जितेंद्र अभिषेकी) सांगायचे जो वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ आहे, तोच शास्त्रीय संगीताची लज्जत घेऊ शकतो. सर्वसाधारण पुस्तके, कादंबऱ्या कुणीही वाचतो; पण ज्याला शेक्‍सपिअर किंवा कालिदास वाचायचा आहे, त्याला प्रथम आपली वैचारिक बैठक तयार करावी लागते. शास्त्रीय संगीताचंही तसंच आहे म्हणूनच या संगीताला मिळणारा प्रतिसाद ठीक आहे.
माध्यमांमुळे आता संगीतक्षेत्राला इतकं एक्‍स्पोजर मिळालं आहे, की संगीताच्या इतर धारांप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकांचा प्रतिसाद मिळावा, असं वाटतं. पण शास्त्रीय संगीताच्या मैफलीसाठी आवश्‍यक संवादी आंतरक्रियेच्या मर्यादेमुळे तसं होणार नाही. नवी पिढी शास्त्रीय संगीत आत्मसात करण्याचा-ऐकण्याचा प्रयत्न करते आहे. मी महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेरही फिरतो. त्यावरून तरी मला सध्याचे चित्र आशादायी वाटतं.
पूर्वी पं. जितेंद्र अभिषेकी, भीमसेन जोशी, कुमारगंधर्व अशी मोजकी नावे लोकांसमोर होती. "एचएमव्ही' ही एकच कंपनी होती. त्यामुळे कलाकाराची एक रेकॉर्ड निघाली तरी त्याचं नाव देशभर व्हायचं. आज माध्यमांमुळे अनेक लोक संगीतक्षेत्राकडे वळल्याने चांगलं काय, वाईट काय - काय ऐकायचं, असा प्रश्‍न लोकांसमोर आहे. त्याचा परिणाम शास्त्रीय संगीताला ज्या कलाकारांनी वाहून घेतलं आहे, त्यांच्यावर होतो. प्रायोजक संस्थाही नावाजलेल्या कलाकाराचेच कार्यक्रम आयोजित करणे पसंत करतात. मग प्रश्‍न असा पडतो की नव्या पिढीतील जे कलाकार शास्त्रीय संगीताची सेवा करतात, त्यांना स्टेज कसं मिळायचे. साधनेसाठी त्यांनी काही वर्षे घालविली, याचा विचार कोण करणार? एखाद्या कलाकाराचे नाव झाल्यानंतरच लोक त्याला पैसे देणार का? कलाकाराला त्याच्या साधना-संघर्षाच्या काळात उत्तेजन, आर्थिक पाठबळ मिळायला पाहिजे. तुलनेने माझ्या पिढीची स्थिती बरी आहे. पंधरा वर्षांपूर्वी, आम्ही "गाणं करतो म्हटलं की म्हणजे काय' असा प्रश्‍न यायचा. शास्त्रीय संगीत अशी एक कला आहे, की ती प्रत्येक गावात-शहरात जाऊन पेश करावी लागते. पहिला पंधरा वर्षांचा काळ कलाकारासाठी महत्त्वाचा असतो. त्याला साथ, मदत-आधार मिळणे आवश्‍यक आहे. या काळात तो झगडत-भोगत राहिला, तर पुढे त्या कलाकाराचे नाव मोठं झाल्यानंतर तो मनमानेल तसे मानधन मागेल आणि संघर्षाच्या काळात झालेल्या अत्याचाराचा सूड उगवेल. यात संगीतक्षेत्राची मोठी हानी होण्याचा धोका आहे. कलाकाराला आर्थिक सुरक्षितता मिळाली, तर संगीतक्षेत्रासाठी ते अधिक फलदायी ठरेल.
पूर्वीची गुरुकुल पद्धत खुंटल्याचा सध्या सूर उमटत आहे. ते बहुतांशी खरंही आहे. गुरुकुल पद्धतीला शास्त्रीय संगीतात पर्याय नाही. आजवर याच परंपरेतून कलाकार तयार झालेत. आजही अगदी छोट्या स्तरावर का होईना गुरूकुलाची परंपरा सुरूच ठेवली तर हिऱ्यासारखे कलाकार तयार होतील. बाबांनी सुरू केलेली गुरुकुल परंपरा मीदेखील पुढे सुरू ठेवली आहे.
सध्या लोकांचा कल मनोरंजकी कलांकडे असल्याने संगीत नाटकांची परंपरा खंडित झाली आहे. याला संगीतकारही तितकेच जबाबदार आहेत. पूर्वी लेखक-संगीतकार आणि निर्माता यांच्या वैचारिक देवाणघेवाणीतून संगीत नाटकांची निर्मिती केली जायची. संगीत नाटकाचा परिणाम पुढे किमान दहावर्षे जनमानसावर टिकून राहावा, हा विचार त्यावेळी केला जायचा. त्याच दृष्टिकोनातून संगीतकारही मेहनत घेऊन संगीत देत असत म्हणूनच ती नाटके आज लोकांच्या स्मरणात आणि त्यातील संगीत लोकांच्या ओठात आहे. आज लेखक, संगीतकार, निर्माते आपल्या "व्यवसाया'त मग्न झाल्याने त्यांच्यातील वैचारिक देवाणघेवाण पूर्णपणे थांबलेली आहे. त्यामुळेच अशाप्रकारची निर्मिती होत नाही.
नवी पिढी शास्त्रीय संगीताला प्रतिसाद देत आहे. फक्त या प्रतिसादाचा प्रवाह व्हायला हवा. हा प्रवाह निर्माण करण्याची जबाबदारी कलाकाराची आहे. बाबा, भीमसेन जोशी, किशोरी अमोणकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपलं नाव चाळीस वर्षे एकाच उंचीवर ठेवलं. रसिकांच्या प्रतिसादाचा त्यांनी प्रवाह निर्माण केला. तीच जबाबदारी आता आमच्यावर आहे. नव्या पिढीनेही आपल्या मुलांमध्ये सांगीतिक गुण असतील, तर त्याला पूर्णवेळ संगीत शिकण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. शास्त्रीय संगीत थांबलय का, या प्रश्‍नावर मी एक दाखला देतो. बाबांच्या काळातही आता शास्त्रीय संगीत काही तरणार नाही, असे लोक म्हणत. त्यानंतर पंधरा-वीस वर्षे गेली संगीत काही थांबलं नाही आणि थांबणारही नाही.

1 comment:

प्रशांत said...

शौनकजींनी मांडलेले सर्व मुद्दे रास्त आहेत. इथे ते प्रस्तुत केल्याबद्दल धन्यवाद.