Monday, December 15, 2008

अपंग तरुणांच्या साहसाची ' मोहीम




शारीरिक अपंगत्व असले म्हणून काय झाले?...मन सुदृढ आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर अपंगत्व हा माणसातील कमीपणा ठरू शकत नाही. मग जिद्दीच्या जोरावर कोणतेही साहसच काय, मोठ्या संकटावरही मात करता येते. सध्याच्या तरुणाईकडून याचे प्रत्यंतर वारंवार येते. मग एखादी कला आत्मसात करणे असो किंवा एखादी साहसी मोहीम फत्ते करणे असो. यात अपंग असलो तरी हतबल नाही, असेच ही तरुणाई दाखवून देत असते. अकोले (जि. नगर) येथे झालेल्या साहस शिबिरातही ते दिसून आले.

नगर आणि अकोला (विदर्भ) येथील "अजिंक्‍य ऍडव्हेंचर ग्रुप'ने अकोले तालुक्‍यात राज्यस्तरीय अपंग साहस शिबिराचे आयोजन केले होते. यात राज्यातील तीस अपंग, मतिमंद आणि अंध तरुणी आणि तरुण सहभागी झाले होते. यात दोन अंध आणि दोन मतिमंद तरुणी होत्या. या शिबिरांतर्गत गिर्यारोहणासाठी महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई आणि लगतच्या मदन (मलंग) गडाची निवड करण्यात आली. जिथे धडधाकट माणूसही चढाई करण्यास कचरतो, तिथे अंध आणि अपंगांना घेऊन जाणे, हे आव्हानच असते. परंतु "अजिंक्‍य'चे स्वयंसेवक प्रशांत अमरापूरकर, धनंजय भगत, विलास लहामगे, जयंत कुलकर्णी, राजेंद्र देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रमपूर्वक सर्वांना आत्मविश्‍वास देऊन ही मोहीम पूर्णत्वास नेली.
या मोहिमेबाबत प्रशांत अमरापूरकर म्हणाले, की दैवाने ज्यांना परावलंबी बनविले. त्यांच्या मनात दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण करून त्यांनाही धडधाकट माणसाप्रमाणे जगण्यास प्रवृत्त करायचे, अशी भावना माझ्या मनात आहे. त्यातूनच "अजिंक्‍य'ची स्थापना झाली. सन 1993 पासून गेली 14 वर्षे ही संस्था सामाजिक व क्रीडा उपक्रमाबरोबरच अपंग तरुणांसाठी धाडसी मोहिमांचे आयोजन करीत आहे. यापूर्वी हिमाचल प्रदेशातही साहस शिबिरांचे आयोजन केले होते.
कळसूबाई आणि मदन गडावरील अनुभव मात्र निराळाच होता. एकतर मदनच्या पायथ्याशी पोचणे, हेच मोठे जिकिरीचे काम आहे. आणि हा गड चढून जाणे त्याहून कठीण. त्यात अपंगांना समवेत घेऊन चढाई करणे, हे आमच्यासाठी एक दिव्यच होते. परंतु आमच्यातील सर्वांनीच ही मोहीम फत्ते करण्याचा निश्‍चय केला होता. आम्ही सर्वजण विकलांग तरुणांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करीत होतो. त्यांना उमेद देत होता. परंतु नंतर असे झाले की आमच्यापेक्षा या तरुणांमध्येच जास्त उत्साह निर्माण झाला होता. त्यामुळेच ही मोहीम यशस्वी झाली.

कळसूबाईवर गिर्यारोहण
कळसूबाईच्या (उंची सुमारे साडेसोळाशे मीटर) शिखरावर जाण्याचा मार्ग अत्यंत खडतर आहे. कुठे अंगावर येणारा चढ, कुठे एकीकडे निमुळती पायवाट आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी, कुठे शिड्या. त्यावर चढून पुढे वाटचाल करावी लागते. या मोहिमेत एक पाय नसलेला राजेश बैजनाथ तावरी हा तरुण सहभागी झाला होता. अनेक अंध तरुण होते. या सर्वांची जबाबदारी स्वयंसेवकावर होती. स्वतःला सांभाळत त्यांनाही सांभाळण्याचे काम प्रत्येकाने चोखपणे बजावले होते. तब्बल चार तास चढल्यानंतर सर्वजण कळसूबाईच्या शिखरावर पोचले. त्यावेळी प्रत्येकाच्याच विशेषतः अपंगांच्या चेहऱ्यावर अपरिमित आनंद दिसत होता. नंतर साहसवीरांचा हा गट कळसूबाई उतरून आंबेवाडीत मदन गडाच्या पायथ्याशी आला. मदन गडावरून शेजारच्या अलंग गडावर व्हॅली क्रॉसिंग करण्यात येणार होते.

थरारक अनुभव
याविषयी विलास लहामगे आणि राजेंद्र देशमुख यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की मदन हा चढाईसाठी महाराष्ट्रात सर्वांत अवघड गड आहे. त्याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे साडेचौदाशे मीटर आहे. हा गड सातवाहन काळातील आहे. स्वातंत्र्य युद्धाच्या काळात क्रांतिकारकांनी या गडाचा उपयोग करून घेतला. ब्रिटिशांचा खजाना लुटून या गडावर ठेवण्यात ठेवला जायचा, असे सांगितले जाते. गिर्यारोहणाच्या साहित्याशिवाय या गडावर चढणे अवघड आहे. चढायला सुरवात झाली, तेव्हा वरपर्यंत पोचतो की नाही, अशी मनात शंका येत होती. परंतु आमच्यासारख्या धडधाकटांपेक्षा विकलांग सहकाऱ्यांचा विश्‍वास दृढ होता. त्यांनी अवघ्या चार तासांत मदनचे शिखर गाठले होते. पुढचा टप्पा व्हॅली क्रॉसिंगचा होता. पाचशे फूट लांबी आणि खाली दोन हजार फूट खोल दरी, अशी स्थिती होती. खोल दरीत डोकावल्यानंतरच अंगावर शहारे येत होते. पुढे तर केवळ एका दोराच्या आधाराने व्हॅली ओलंडायची होती. हा अत्यंत थरारक अनुभव होता... प्रत्येकजण दरी ओलांडून अलंग गडावर येत होता. तोपर्यंत प्रत्येकाचाच श्‍वास रोखला जात होता.
सर्वजण अलंगवर पोचले. आता याच गडावरून आम्ही खाली उतरणार होतो. अलंगवर एकदिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उतरण्यास सुरवात केली. सर्वाधिक काळजी उतरताना घ्यावी लागणार होती. अनेक ठिकाणी जागेवर उताराचा भाग असल्याने पाय घसरण्याची शक्‍यता जास्त होती. त्यामुळे उतरताना बहुतांश ठिकाणी शिड्यांचा वापर केला. याच दरम्यान काहीजणांनी रॅपलिंगही (दोराच्या साह्याने) केले. प्रत्येकजण विजयी मुद्रेने उतरत होता. कारण अपंगांना घेऊन एक मोहीम पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी झालो होतो.
या मोहिमेत सहभागी झालेला विदर्भातील राजेश तावरी याची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. तो म्हणतो, ""सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर गिर्यारोहण करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. शरीराचा एक अवयव नाही म्हणून काही जीवन थांबत नाही.'' अपंगत्वामुळे जे स्वत:ला दुर्बल समजतात त्यांच्यासाठी हे वाक्‍य निश्‍चितच उमेद देणारे ठरेल.
प्रशांत अमरापूरकर : 9422228810
विलास लहामगे : 9423160513