Friday, December 21, 2007

संगीत साधना सोपी नाही. अत्यंत परिश्रमातूनच ही कला साध्य होते. अंगभूत प्रतिभा आणि त्या जोडीला परिश्रम असतील, तरच या क्षेत्रात अलौकिक प्राप्त होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाबूजी. अर्थात सुधीर फडके. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी संगीत साधना केली आणि स्वत:चे पर्व निर्माण केले. त्यांच्या सांगितिक वाटचालीविषयी एक आठवण...

संगीत साधनेसाठी...

अंगभूत प्रतिभेच्या जोरावर संगीत क्षेत्रात स्वत:चे युग निर्माण करणारे संगीतकार सुधीर फडके यांनी संगीत साधनेसाठी केलेली वाटचाल अत्यंत खडतर होती. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक बापू वाटवे यांनी त्याची एक आठवण सांगितलेली आहे. कोल्हापूरमधील पं. वामनराव पाध्ये यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर बाबुजी संगीत साधनेसाठी मुंबईत आले. एका चाळीत त्यांना राहण्यासाठी जागा मिळाली. भल्या पहाटे आन्हीक उरकून सार्वजनिक नळावर आंघोळ करायची आणि भायखळ्याच्या भाजी बाजारात हजर व्हायचे. फळे, भाज्या खरेदी करायच्या कधी भाड्याची सायकल घेऊन तर कधी पायी गिरगाव ते दादर दारोदार फिरुन भाजी विकायची. काहीवेळा जोडीला चहा पावडर असे. त्यातून मिळणाऱ्या पैशात बाबुजी गरजा भागवायचे. हा उद्योग आटोपला की संगीताच्या शिकवण्या करायच्या, मेळ्यातील गाण्यांना चाल लावून द्यायची. "हिज मास्टर्स व्हाइस' कंपनीत संगीतकारापासून म्युझिक हॉल साफ करण्यापर्यंत पडेल ते काम करायचे. असे अनेक कष्ट बाबुजींनी केले. दिवसभर गाऊन एक आणेली मिळाली तरी त्यावर त्यांनी समाधान मानले. मध्य प्रदेशातील एक गोंड राजाने बाबुजींच्या गाण्यावर प्रसन्न होऊन त्यांना त्याकाळी शंभर रुपयांची बिदागी दिली होती. पण एकदा पैशांची खूप निकड भासली म्हणून त्यांना पेटी आणि तंबोराही विकावा लागला होता.

Friday, December 14, 2007

सत्यशोधक समीक्षक

सत्यशोधक समीक्षक

मराठी व शास्त्रीय संगीत समीक्षा केशवराव भोळे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी भावसंगीताचे जनक, नाट्यसंगीत विचाराला योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्त्व अशीही केशवरावांची ख्याती आहे. केशवराव हे विदर्भातील अमरावतीचे निवासी. विसाव्या शतकातील आस्वादक संगीत समीक्षा आणि मराठी सुगम संगीत यावर केशवरावांनी "केशवमुद्रा' उमटविली. त्यायोगे त्यांनी या शतकाला कृतज्ञ केले आहे, अशी भावना ज्येष्ठ समीक्षक श्रीरंग संगोराम यांनी व्यक्त केली आहे. केशवराव "एकलव्य' या नावाने संगीत समीक्षा करीत असत. केशवरावांनी संगीतशास्त्र आत्मसात करण्यासाठी कुणाचा गंडा बांधला नाही. जे जे चांगले ते ते नीरक्षीर विवेकाने ते वेचत राहिले. त्यांची साधना एकलव्यासारखी होती. म्हणूनच की काय त्यांनी "एकलव्य' हे टोपणनाव धारण केले होते. केशवराव खरे तर डॉक्टर होण्यासाठी मुंबईला गेले होते. परंतु नादब्रह्माचा "नाद' वरचढ ठरला. त्याकाळी मुंबईतील वास्तव्यात त्यांनी भास्करबुवा बखले, उस्ताद करीम खॉं, केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर, मंजीखॉं, हिराबाई बडोदेकर, मास्टर कृष्णराव, बालगंधर्व, सवाई गंधर्व, सुंदराबाई जाधव अशा अनेक दिग्गजांच्या मैफलीचा व संगीत नाटकांचा आनंद लुटण्यात त्यांनी आपल्या रात्री "रमविल्या' या सर्वांच्या गाण्यातील "अमृतकण' त्यांनी वेचले. पुढे आकाशवाणी कलाकार म्हणूनही त्यांनी काम केले. नंतर आकाशवाणीवर ते अधिकारीही झाले. मात्र, केशवरावांना ओळखले गेले ते साक्षेपी संगीत समीक्षक म्हणून. त्यांची संगीत समीक्षा बहुविध आणि व्यापक होती. रागदारी कंठसंगीत हाच तिचा मुख्य विषय होता. आपल्या समीक्षेद्वारे रसिकांना व अभ्यासकांना रसाग्रही वृत्तीने संगीताकडे पाहण्याची दृष्टी लाभावी हा केशवरावांचा हेतू होता. त्यांनी आपल्या संगीत समीक्षेत भावसौंदर्याबरोबरच शास्त्राची बूजही दक्षतापूर्वक राखलेली दिसते. समीक्षेतून जाणता श्रोता निर्माण करणे हे केशवराव आपले कर्तव्य मानीत होते. आस्वादक संगीत समीक्षेबद्दलचे त्यांचे विचार शुद्ध कलात्मक दृष्टीचे, तटस्थतेचे आणि कर्तव्यबुद्धीचे महत्त्व पटवून देणारे होते.केशवरावांनी आपल्या संगीत समीक्षेत काही तत्त्वे मूलभूत मानली ही तत्त्वे त्यांनी कोणत्या घराण्यावरून ठरविली नाही, तर वेगवेगळ्या घराण्याची गायकी ऐकून निश्चित केली. केशवरावांनी चार कलाकारांना आपल्या समीक्षा विचारांच्या केंद्रस्थानी मानले. गायनाचार्य भास्करबुवा बखले, उस्ताद फय्याज खॉं, उस्ताद मंजीखॉं आणि उस्ताद करीम खॉं हे ते चार कलाकार. या चौघांचेही गायन केशवरावांनी मनमुराद ऐकले. त्यातून आपला संगीत विचार त्यांनी पक्का केला. हे चारही कलाकार वेगवेगळ्या घराण्याचे होते. गायनात बिलंपतीवर भर असावा, त्यात स्थायी व अंतरा हे दोन्ही ठाशीव पद्धतीने असावेत. गायनात अर्थपूर्ण शब्दोच्चार सौंदर्याची बूज राखली जावी. त्यात मींड, घसीटयुक्त आलापीने डौलदारपणे समेवर येऊन पुन्हा पुन्हा सुखद संवेदना निर्माण होत राहावी, तानबाजीचा अतिरेक नसावा, तानेत रागशुद्धता व सुरेलपणा असवा, या सौंदर्य घटकांची प्रचिती केशवरावांना भास्करबुवांच्या गायनात आली. इतर तीन कलाकारांच्या गायनातही थोड्याफार फरकाने हेच घटक दृग्गोचर झाल्याचे प्रत्यंतर त्यांना आले.भास्करबुवा ग्वाल्हेर घराण्याचे, फय्याज खॉं आग्रा घराण्याचे, मंजीखॉं जयपूर घराण्याचे तर करीम खॉं किराणा घराण्याचे होते. फय्याज खॉं शृंगाररसाचे बादशहा, तर मंजीखॉं विविध रसप्रवीण आणि करीम खॉं करुण रसाचे पारिपोषक होते. अशा बहुविधरंगी कलानुभवावरून केशवरावांच्या संगीत विचारांची जडणघडण झाली. या पक्व विचारांवरच त्यांची समीक्षा आधारलेली आहे. केशवरावांच्या लेखनशैलीला उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, दृष्टांत या अलंकाराने सजण्याचा सोस नव्हता. विशेषणयुक्त भाषेच्या फुलोऱ्याने मूळ तत्त्वाला बगल देण्याची चलाखी त्यांनी कधी दाखविली नाही. तशी गरजही त्यांना कधी वाटली नाही. कारण केशवराव स्वतःच अवलिया कलाकार होते. त्यांचे संगीत विचार समृद्ध आणि वृत्ती सत्यशोधक होती. संगीत क्षेत्रात केशवरावांसंबंधी विरोधी सूरही आळविले गेले. व्यक्तिद्वेषाचे आरोपही झाले. परंतु हे तितकेसे खरे नाही. त्यांची समीक्षा सत्यशोधक व परखड होती. तसेच ते गुणग्राहक देखील होते. परंतु समीक्षेत त्यांनी तुष्टीकरणाचे डावपेच केलेले दिसत नाहीत. ""टीकाकार हा तत्त्वाचा बंद आहे; व्यक्तीचा मिंधा नाही,'' असे त्यांनी एका समीक्षापर लेखात रोखठोकपणे सांगून टाकले होते. गुरुपरंपरा चालविली नाही म्हणून केशवरावांनी मास्टर कृष्णरावांवर ठपका ठेवून टीका केली. बालगंधर्वांच्याही चुकीच्या नाट्यमूल्यांचा त्यांनी समाचार घेतला. पण बालगंधर्वांच्याच ऐन उमेदीच्या गाण्याचे प्रात्यक्षिकासह वर्णन करताना त्यांनी आसवेही ढाळली. कलामूल्यांसाठी आसक्त उपासकाला त्यांनी दिलेली ही दादच होती.

Tuesday, December 11, 2007

भाषा आणि माणूस एकमेकांपासून वेगळे करता येतील? कुणी म्हणेल हा काय प्रश्‍न झाला. बरोबर आहे! भाषा आणि माणूस वेगळा करताच येणार नाही. इतकी घट्ट ती (म्हणजे भाषा) प्रत्येकाला चिकटलेली आहे. प्रत्येक जण आपल्या प्रदेशानुसार भाषेचा आविष्कार घेऊन पुढे येत असतो. म्हणजे असं... माणूस नगरी असेल, तर तो "काय करतोस' असं पुणेरी बोलणार नाही. "काय करुन राह्यला रे' असंच वाक्‍य त्याच्या तोंडून बाहेर पडेल. मैलागणिक भाषा बदलते, असं म्हणतात ते काही खोटं नाही. खेड्यात गेलं तर तिथे पुणेरी (कथित शुद्ध) बोली रुचणार नाही. त्या गावची "गावंढळ' भाषाच तिथे आपली वाटेल. तिथे होणारी निर्मिती मग ती कविता असेल, नाटक असेल किंवा आणखी काही... त्या भाषेचा बाज त्या कलाकृतीमध्ये असेल. यावर "पुल'नी फार चांगली टिपणी केली आहे... वाचा...


संगीत आणि भाषा

सुधीर फडके यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या स्वरतीर्थ ग्रंथात पु. ल. देशपांडे यांनी बाबुजींचा गौरव करताना संगीत आणि भाषा यावर टिपणी केली आहे. प्रत्येक भाषा आपल्या संगीताचा आविष्कार घेऊन येत असते. प्रत्येक भाषेचे आपले म्हणून काही स्वभाव असतात. गीतातील भाव प्रकट करण्याचीही त्या भाषेची स्वतंत्र चाल असते. मराठी अभंगाला पंजाबी ढंगाची चाल मानवणारी नाही. अनेक वर्षांचे स्वर संस्कार चालत आलेले असतात. त्या परंपरेशी असलेले नाते साफ तोडून चालत नाही. जाझच्या ठेक्‍यात अभंग बसविणे अशक्‍य नाही; पण तो भक्तीभावना व्यक्त करणारा अभंग राहणार नाही. त्याचे नाते थेट परदेशी नाईट क्‍लबशी जुळेल. प्रार्थनेचे सूर मंदिरातले आहे, चर्च मधले आहेत की, मशिदीतून येणाऱ्या बांगेचे आहेत, हे परंपरेने आलेल्या स्वररचनेवरून सिद्ध होते. सतत कानावर पडणाऱ्या स्वररचनांशी काही घटनांचे किंवा प्रसंगांचे वर्षानुवर्षे साहचर्य असते. आपल्याला शार्दूलविक्रिडितातील विशिष्ट चाल एकण्याची सवय आहे. त्या चालीचे मराठी लग्न समारंभाशी साहचर्य आहे. त्यामुळे मंगलाष्टके बदलून म्हटले तर आपल्याला रुचणार नाहीत. सकाळ, दुपारचे, सध्याकाळ, रात्रीचे राग हे वर्षानुवर्षाच्या साहचार्यामुळे आपल्याला त्या त्या वेळी अधिक गोड वाटतात. म्हणूनच नव्या चाली करताना स्वरांच्या साहचर्याचे भान ठेवणे महत्त्वाचे असते!
आजच्या "पुढारलेल्या' जमान्यात संगीत कला आत्मसात करणं खूप सोपं झालंय. म्हणजे फारसं अवघड राहिलेलं नाही, नाही का? पूर्वी ही कला आत्मसात करण्यासाठी कोण कष्ट पडत होते. त्यासाठी काय काय करावे लागे, याचे किस्से वाचले की वाटतं. खरच पूर्वीच्या गायक, वादकांनी अतोनात कष्ट केले म्हणून तरी आपल्याला आज काही चांगलं ऐकायला मिळतं. तेव्हा जर का आजच्या सारखी गल्लीबोळात संगीत विद्यालये असती, तर आपण आज कुणाला "मोठी माणसं' म्हटलो असतो. हा खरं तर माझ्यापुढचा प्रश्‍न आहे. याचं उत्तर तुमच्याकडं असेल तर आवश्‍य कळवा. उत्तराचे मानधन खाली दिलेले आहे; किश्‍श्‍यांच्या रुपात...

मारवा आणि वसंतराव देशपांडे

नदीकाठची शांत सायंकाळ. सूर्य मावळतीकडे निघालाय. त्याच्या तांबूस प्रभेने आसमंत व्यापावा. त्याचवेळी मारव्याचे स्वर कानी पडावे... शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्या प्रत्येकाला मुग्ध करणारा हा माहौल! संध्याकाळ आणि मारवा हे जसं समीकरण आहे तसं मारवा आणि पं. वसंतराव देशपांडे हेही सूत्र आहे. गाणं शिकण्यासाठी पं. वसंतराव देशपांडे पतियाळा घराण्याचे उस्ताद असदअली खॉं यांच्याकडे गेले. खॉंसाहेब त्यावेळी लाहोरमधील एका दर्ग्यात राहात असत. एक पैसा दिला की त्यांच्याकडून एक चीज मिळत असे. वसंतरावांनी अशाप्रकारे चाळीस चीजा मिळविल्या. ही गोष्ट त्यांनी अभिमानाने आपल्या मामाला सांगितली. पण मामानं वसंतरावांनाच सुनावलं, ""खरं गाणं शिकायचं असेल तर ही वही पहिली जाळून टाक आणि खॉंसाहेबांचा गंडा बांध.'' मामा एवढे सांगून थांबला नाही, तर त्यांनी वसंतरावांना दोन रुपये दिले. त्यांनी या दोन रुपयांतून गांजा, शुद्ध तुपातील मिठाई असं सामान बरोबर नेलं. गुरुउपदेशाचा राग म्हणून खॉंसाहेबांनी सायंकाळी त्यांना मारवा शिकविण्यास सुरवात केली. पुढे चार-पाच महिने वसंतरावांनी खॉंसाहेबांकडून फक्त मारव्याचीच तालीम घेतली. तेव्हापासून वसंतराव आणि मारव्याचं नातं दृढ झालं.