Thursday, July 17, 2008

इहलोकीचा गंधर्व

बड्या शास्त्रीय गायकांच्या रेकॉर्डमधील गाणं तो अगदी जसंच्या तसं म्हणत असे. अचूक स्वरस्थाने, स्वरलगाव, तानांची फेक अगदी सारखं. लहान वयातील त्याच्या या हुशारीचे घरातल्यांबरोबरच इतरेजनांनाही अप्रूप वाटे. कुठलीही रेकॉर्ड एकदा ऐकली की दुसऱ्यांदा ती हुबेहूब गाऊन दाखवायची इतकी त्याची बुद्धी कुशाग्र होती. एका मोठ्या गुरूकुलातील गुरूंना त्याचे गाणं ऐकविण्यात आले. त्यांनाही या लहानग्याच्या स्वरांनी तृप्त केलं. त्याची लहान वयातील तयारी, प्रचंड ग्रहणशक्ती पाहून ते गुरू प्रसन्नचित्त झाले. त्यांनी त्याला सोन्याचे पदक बक्षीस दिलं. त्यावर कोरलं होतं "कुमार गंधर्व'. तो होता शिवपुत्र कोमकली.
शिवपुत्रची मैफल रंगविण्याची क्षमता असल्याने वडील सिद्धरामय्या यांनी "कुमार गंधर्व आणि पार्टी' अशी संस्था स्थापन केली. अनेक मैफली झाल्या. छोट्या कुमारच्या असामान्य कुवतीचे कौतुक सर्वत्र होत होते. वयाच्या सातव्या वर्षापासून सुरू झालेल्या या मैफली पुढे तीन-चार वर्षे सुरू होत्या. पण रेकॉर्डमधील गाण्यांचे अनुकरण किती दिवस करीत राहणार, असा विचार सिद्धरामय्यांनी केला आणि कुमारला शास्त्रीय संगीताची तालीम देण्याचे ठरविले. गुरूचा शोध सुरू झाला. यादरम्यानच (1935) छोट्या कुमारला प्रयाग संगीत परिषदेतर्फे आमंत्रण आले. कुमारने या मैफलीत एका रेकॉर्डमधील गाणं सादर केलं. मैफलीस खॉंसाहेब फय्यायखॉं, प्रा. बी. आर. देवधर यांच्यासारखे कलाकार हजर होते. तेही कुमारच्या गाण्यानं भारावून गेले. पुढे संयोगाने देवधर गुरुजींकडेच छोट्या कुमारचे गायनाचे शास्त्रीय शिक्षण सुरू झाले. रामनियम, बंदिश पेश कशी करावी, बंदिशीच्या अंगाने रागविस्तार कसा करावा, बोलतानाची उपज, तानेची फेक या शास्त्रोक्त तरकिबींचे शिक्षण देवधर गुरुजींनी कुमारला दिले. संगीतातील शास्त्र आणि कला यांच्या सांगड घालून मैफल मांडणीची खासियत, काही पथ्ये याचा परिपूर्ण विचार करायला प्रवृत्त करणारा अद्वितीय गुरू कुमार गंधर्वांना लाभला. तर कुमारजींच्या रूपाने असामान्य प्रतिभेचा शिष्योत्तम देवधर गुरुजींना मिळाला. चांगल्या गुरूला चांगला शिष्य आणि चांगल्या शिष्याला चांगला गुरू मिळणे, हा संयोग असतो. देवधर गुरुजी आणि कुमार गंधर्व या दोघांनाही हे भाग्य लाभलं!
पं. कुमार गंधर्वांनी संपूर्ण जीवन संगीत कलेस समर्पित केलं. परंपरेतील संगीतातून स्वनिर्मित सर्जनशील गायनशैलीची उभारणी करून संगीतात परंपरा आणि नवता यांचा संगम त्यांनी साधला. म्हणूनच कुमार गंधर्वांना संगीतक्षेत्रात नवसर्जनतेचे प्रणेते मानले गेले. कुमारजींची गायकी आत्मप्रचितीतून विकसित झाली. तिच्यात उत्स्फूर्तता होती. म्हणूनच ती उत्कट चैतन्य निर्माण करणारी ठरली. स्वरलयीशी एकरूपता हा कुमार गायकीचा धर्म आहे. त्यामुळेच स्वराशी एकनिष्ठ राहून तादात्म पावण्याचे परमोच्च सुख देणारी शक्ती म्हणजे कुमार गंधर्व शैली, असे म्हटले गेले.
संगीत कलेविषयी कुमारजींची मते स्पष्ट आणि परखड होती. कलेचा हेतू अभिव्यक्ती आहे. कला साधता आली पाहिजे. कलाकार कला अभिव्यक्त करतो तेव्हा त्याला रसिकांशी संवाद साधता येणे आवश्‍यक आहे. अभिजात संगीत समजून घेतले तरच त्याचा आस्वाद आणि त्यातील चिरंतन आनंद श्रोत्यांना मिळतो, ही देवाणघेवाण कलाकार-श्रोत्यांत असावी. गायकीतील आक्रमकता म्हणजे जोरकस स्वर लावून गाणे, असा नसून स्वरामधील आघातानुसार गायकीतील आशय समजावून देण्याची खासियत आहे, असे ते मानत. कोणत्याही रागाकडे कुमारजींनी पूर्णरुपाने पाहिले. राग ही चालती-बोलती माणसे आहेत, अशी त्यांची धारणा होती.
संगीताचा उगम लोकसंगीतात आहे, असे कुमारची म्हणत. त्यांनी प्रचंड सांगीतिक शोधकार्य केले. 1948च्या दरम्यान कुमारजी मध्य प्रदेशातील देवास येथे स्थायिक झाले. तिथे माळवी लोकसंगीत त्यांना ऐकायला मिळाले. माळव्याच्या लोकगीताइतकी श्रीमंती दुसऱ्या लोकगीतात नाही, असे कुमारजी कौतुकाने सांगत.
माळवा प्रांतातील अनेक गावातील बायका लोकगीत गात असत. अशा असंख्य लोकधुना कुमारजींनी मिळविल्या. त्याचे स्वरलेखन केले. ज्या धुनांमध्ये रागबीजे आढळली, अशा धुनांमधून त्यांनी राग निर्माण केले. कुमारजी त्याला धुनउगम राग म्हणायचे. मालवती, मधुसुरजा, राही, भवमत भैरव, सहेली तोडी, बीहड भैरव असे ते धुनउगम राग आहेत. गांधी मल्हार, गौरी बसंत, केदारनंद, चैतीधूप, रतीवैभव, दुर्गा केदार, धनबसंती, कामोदवंती, अशा शास्त्रउगम (पारंपरिक रागातून) रागांची निर्मितीही कुमार गंधर्वांनी केली. त्यांच्या अपार कष्टातून ही नवनिर्मिती झाली. नवनिर्मिती हा त्यांच्या आत्मशोधनातला सततचा ध्यास होता. या ध्यासातून जे सृजन झाले तेच कुमार गंधर्व!

1 comment:

Dhananjay said...

Good article on Kumar! I am die-hard fan of Kumar Gandharva. I have written about his durga at

http://amritvarshini.blogspot.com/2008/04/blog-post.html