Tuesday, June 23, 2009

मोठेपणी मिळालेले 'बाळ'कडू


एखादे लहान मूल कुठल्याशा फालतू गोष्टीसाठी अडून बसते. त्याची कुरकुर सुरू असते. अशावेळी त्याचे आई बाप समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात... पण त्याची कुरकुर काही थांबत नाही. हट्ट पुरा होता नाही म्हणून मग मूल भोकाड पसरते. ते रडणे थांबविण्यासाठीही आई बापाचा आटापिटा सुरू असतो.
बहुतांश वेळा दिसणारे हे दृश्‍य. मला नेहमी प्रश्‍न पडायचा की ते आई बाप एक रट्टा देऊन मुलाला गप्प का बसवत नाहीत. एवढी विनवणी, बाबा पुता करण्याची गरज काय असते? हट्ट केला की थोडे दरडवायचे. ऐकले नाही तर एक फटका देऊन त्याला शांत करायचे. एवढ्या साध्या मार्गाने आई बाप का जात नाहीत?
या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मला स्वत:लाच मिळाली आहेत. यापुढे भविष्यात यातील एकही प्रश्‍न मला सतावणार नाहीये. मुलांचे रडणे थांबविण्यासाठी आई बाबाने लेकाला रट्टा हाणावा, असा विचार माझ्या मनात यापुढे कधीही येणार नाहीये. मुलाने कितीही हट्ट केला की आई बाप त्याला समजावतात, दुखावत का नाहीत, तो हे म्हटला की हे, ते म्हटला की ते, असं का करतात, त्याच्या तालावर का नाचतात, हेही मला समजलंय. कारण मी एका मुलाचा बाबा झालोय.
तसा मी फटकळ आणि तिरसट प्रवृत्तीचा माणूस. म्हणूनच की काय एखादं मूल रडायला लागलं की आई बापानं त्याला रट्टा देऊन शांत करावं, अशी माझी अपेक्षी असायची. पण आता हळूहळू बदलतोय... असं म्हणण्यापेक्षा बदलणं भाग पडलंय... मुलामुळे! त्याचं हसणं, शांत राहाणं आणि रडणं सारंच मला आंतर्बाह्य हलवून टाकतंय. त्याच्या चेहऱ्यावरील हास्यामुळे होणारा आनंद, शांत राहाण्यात वाटणारी काळजी आणि रडला की येणारा राग, हे सगळं अव्यक्त आहे. यातील कोणतीही गोष्ट शब्दांत सांगता येणार नाही. मात्र मी त्याचा मजेने अनुभव घेतोय. स्वत:ला तटस्थ नजेरूतून बघू लागलोय.
सकाळी अकरावाजेपर्यंत कधीही झोपेतून न उठणारा हा बाप बाळाच्या एका हुकारानं ताडकन उठून बसतोय. एरवी एखाद्या बाळाने शी केली की ईऽऽऽ म्हणणाऱ्या याच बापाला बाळाच्या आईच्या गैरहजेरीत आता बाळाची हागमूत काढवीच लागतेय. तो रडला की त्याला कधी कधी झोळीत टाकून झोपेपर्यंत झोळी हलवावीच लागतेय. त्याची दुपटीही त्रागा न करता कधी वाळत टाकावी लागताहेत. तो रडला की त्याच्या पोटात दुखत असेल काय, डोकं तर दुखत नसेल ना? त्याला थंडी वाजत असेल का, की गरम होत असेल? या विचारानं त्याचा जीव कासावीस होतोय. त्याला पडणाऱ्या प्रश्‍नानं तो आता आपल्या आई आणि पत्नीला तेच प्रश्‍न विचारून बेजार करू लागलाय. एरवी त्यांना काय कळतंय, अशा थाटात वागणाऱ्या हा बापाला, ""काही नाही रे. रडतात मुलं.'' या आई आणि बायकोच्या समजावणीचा कोण आधार वाटू लागलाय....
पूर्वीचा तो तूच आहेस का, असा प्रश्‍न माझ्या आईने मला विचारलाय!

No comments: